अमरनाथ यात्रा थांबवली
By Admin | Published: July 8, 2017 04:56 PM2017-07-08T16:56:14+5:302017-07-08T16:56:14+5:30
काश्मीर खोऱ्यात तयार झालेली तणावाची स्थिती लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा जम्मूपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि.8- दहशतवादी बुरहान वानीला ठार मारल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने काश्मीर खोऱ्यात तयार झालेली तणावाची स्थिती लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा जम्मूपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे जम्मु आणि काश्मीर राज्यात काही शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.
याबाबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली, "काश्मीर खोऱ्यातील परिस्थित लक्षात घेता भगवती नगर कॅम्पपासून यात्रा रोखण्यात आलेली आहे". अमरनाथ शिवलिंग हे 3880 मी. उंचीवर एका गुहेमध्ये आहे. ही यात्रा करण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात. बाल्टाल आणि पहलगाम अशा दोन कॅम्पपासून ही यात्रा केली जाते.
चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेस 29 जूनपासून प्रारंभ झाला असून पहिल्या सहा दिवसांत जवळपास 80,000 यात्रेकरूंनी अमरनाथची यात्रा पूर्ण केली आहे. अमरनाथची यात्रा 29 जूनला सुरू होऊन 7 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी समाप्त होईल. यंदा झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे बाबा बर्फानी (हिम शिवलिंग) आपल्या पूर्ण आकारात दर्शन देतील, असा भक्तांचा विश्वास आहे. यंदा या यात्रेच्या सुरक्षेसाठी अनेक पदरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यात्रेकरू आणि वाहनांच्या शोधासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण देण्यात येत आहे.
अधिक वाचा-
दरम्यान, बुरहानला ठार मारल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर बोलताना बुरहानच्या वडिलांनी शांततेचे आवाहन केले आहे. त्राल खेरीज शोपियां आणि ट्रेहगाम येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून अन्य ठिकाणीही संचारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. विद्यापीठांनी आज असलेल्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.