अमरनाथ यात्रा दुस-या दिवशीही स्थगित, काश्मीरमध्ये संचारबंदी
By Admin | Published: July 10, 2016 10:45 AM2016-07-10T10:45:08+5:302016-07-10T10:54:35+5:30
सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत १२ आंदोलक ठार झाल्यानंतर काश्मीर खो-यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १० - सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत १२ आंदोलक ठार झाल्यानंतर काश्मीर खो-यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली असून, सलग दुस-या दिवशी रविवारी अमरनाथ यात्रा स्थगित ठेवण्यात आली आहे.
हिज्बुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याचा सुरक्षा दलांनी शुक्रवारी एका चकमकीत खातमा केल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला आहे. शांतता राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन काश्मिरचे विभागीय आयुक्त असगर हुसैन सामून यांनी केले आहे.
काश्मीर खो-यात हिंसक झालेल्या जमावाने शनिवारी चार पोलिस चौक्यांना आग लावली. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. जमावाने जवानांची शस्त्रास्त्रे खेचून घेण्याचा प्रयत्न केला तसेच सुरक्षा दलाच्या गाडयांना आग लावली. शनिवारच्या चकमकीनंतर तीन पोलिस बेपत्ता असून, ९६ जवान जखमी झाले आहेत.
Curfew imposed in parts of J&K following protests over #BurhanWani's killing (Visuals of shutdown from Srinagar) pic.twitter.com/wOk4amQCqh
— ANI (@ANI_news) July 10, 2016