गुजरात निवडणुकीसाठी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला? हार्दिक पटेल
By admin | Published: July 11, 2017 12:22 PM2017-07-11T12:22:22+5:302017-07-11T12:41:43+5:30
या हल्ल्याचा संपूर्ण देशाभरातून सध्या निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, काही जणांनी या हल्ल्याचे षडयंत्र रचल्याचा संशय व्यक्त केला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशाभरातून सध्या निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, काही जणांनी या हल्ल्याचे षडयंत्र रचल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी या हल्ल्यामागे वेगळीच शंका व्यक्त केली आहे.
हार्दिक पटेल यांनी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या हल्ल्याला यावर्षी होणाऱ्या गुजरात निवडणुकीशी जोडलं आहे. त्यांनी ट्विटरवर तशी शंका व्यक्त केली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भाविकांमध्ये गुजरातमधील लोकांचा जास्त प्रमाणात सहभाग आहे. काल रात्री 11:45 वा हार्दिकने ट्विटरवर आपली शंका व्यक्त केली. यामध्ये त्यांनी लिहले, यावर्षी गुजरात निवडणुक होणार आहे. अमराथ यात्रेतील भाविकांवर झालेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यात गुजरातमधील भाविकांचे प्रमाण आधिक आहे. हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश की षडयंत्र?, या हार्दिकच्या प्रश्नामुळे आता नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा -
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला.