अमरनाथ यात्रेला अतिरेक्यांचा धोका
By admin | Published: June 29, 2016 06:08 AM2016-06-29T06:08:49+5:302016-06-29T06:08:49+5:30
अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.
नबीन सिन्हा,
नवी दिल्ली- ऐतिहासिक अमरनाथ यात्रा २ जुलैपासून सुरू होत असून, अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.
दोन महिने चालणाऱ्या या यात्रेसंबंधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयान
चर्चेच्या अनेक फेऱ्या चालविल्या आहेत. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गृहसचिव राजीव महर्षी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावत सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. दररोज ७५०० यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार असून, दोन दिवसांत हजारावर यात्रेकरू परतीची वाट धरतील.
गेल्या १० दिवसांतील घडामोडी विशेषत: सुरक्षा दलावर अतिरेक्यांनी केलेला हल्ला गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. खरे तर अनंतनाग आणि पाम्पोर येथे सीआरपीएफच्या पथकावर झालेले हल्ले सुरक्षा दलासाठी आव्हान ठरले आहेत.
>नॉर्थ ब्लॉकला विशेष नियंत्रण कक्ष...
केंद्रीय गृहमंत्रालय असलेल्या दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून यात्रा मार्गांवर अनेक बुथ उभारले जातील. संपूर्ण भागात विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अतिरेक्यांचे हब असलेल्या दक्षिण काश्मीरमधून यात्रामार्ग जात असल्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना रात्री जागून काढाव्या लागतील. पोलिसांनी जम्मूलगतच्या राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालण्यावर लक्ष केंद्रित केले आहे..