अमरनाथचे हिमलिंग झाले २0 फुटांचे
By admin | Published: April 28, 2016 04:05 AM2016-04-28T04:05:28+5:302016-04-28T04:05:28+5:30
हिमलिंगाचा आकार २0 फूट झाला आहे आणि दुसरी बातमी म्हणजे यंदाच्या यात्रेवरही दहशतवादाचे सावट आहे.
सुरेश एस. डुग्गर, श्रीनगर
अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या आणि हिमलिंगाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी दोन बातम्या आहेत. एक म्हणजे हिमलिंगाचा आकार २0 फूट झाला आहे आणि दुसरी बातमी म्हणजे यंदाच्या यात्रेवरही दहशतवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना दहशती कृत्यांचा त्रास होऊ नये, म्हणून सुरक्षा दलांनी जोरदार तयारी सुरू केली असून, आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास तसेच संशय येताच छापे मारण्यास सुरुवात केली आहे.
अमरनाथ यात्रेत हिजबुल मुजाहिद्दीन संघटना अडथळे आणेल वा काही दहशतवादी कृत्ये करील, अशी भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये तरुणांची भरती करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या जबाबातून ही यात्रा सुरळीत होऊ द्यायची नाही, असे या संघटनेने ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांना आतापासूनच सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
1 बाबा बर्फानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमलिंगाचा आकार यंदा मोठा असेल, असा आतापर्यंतचा अंदाज आहे. अर्थात अमरनाथ देवस्थान मंडळाचे पथक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिथे जाऊन पाहणी करणार आहे. मात्र ज्यांनी तिथे जाऊन पवित्र गुंफेचे दर्शन घेतले, त्यांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर अद्याप बर्फ साचलेला असून, तो काढायची सुरुवात मे महिन्यात होईल.
2 यंदा २ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गात यंदा लंगरचे (मोफत भोजन) मंडप उभारण्यास परवानगी दिली असून, ३२ डॉक्टरांचे पथकही या मार्गावर असेल.