सपाकडून अमरसिंग राज्यसभेचे उमेदवार

By admin | Published: May 18, 2016 04:25 AM2016-05-18T04:25:27+5:302016-05-18T04:25:27+5:30

अमरसिंग यांना समाजवादी पक्षाने पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Amarsing Rajya Sabha candidate from SP | सपाकडून अमरसिंग राज्यसभेचे उमेदवार

सपाकडून अमरसिंग राज्यसभेचे उमेदवार

Next

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या अमरसिंग यांना समाजवादी पक्षाने पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. अमरसिंग यांनी अद्याप पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे पक्षाचे काही नेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. यंदा पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या गावी होणाऱ्या सैफेई महोत्सवाला अमरसिंग यांनी अचानक हजेरी लावली होती. तेव्हापासून ते आणि मुलायमसिंग पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती.
अमरसिंग हे एके काळी पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या अतिशय विश्वासातील नेते म्हणून ओळखले जात.
समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या सात उमेदवारांची नावे मंगळवारी जाहीर केली असून, त्यात चारच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून पक्षात परतलेल्या बेनीप्रसाद वर्मा यांचाही समावेश आहे. वर्मा हेही काही वर्षांपूर्वी समाजवादी पक्षातच होते. उत्तर प्रदेशातील कुशवाह समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगण्यात येते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या उमेदवारांची नावे पक्षासाठी महत्त्वाची आहेत.
याखेरीज लखनौमधील मोठे बांधकाम व्यावसायिक व वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेले संजय सेठ यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली आहे. याआधी विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त म्हणून संजय सेठ यांना पाठविण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला होता. मात्र राज्यपाल राम नाईक यांनी त्यांच्या नावाला आक्षेप घेतल्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आले होते.
रेवती रमण सिंग, सुखराम सिंग यादव, विश्वंभर प्रसाद निषाद आणि अरविंद प्रताप सिंग यांची नावेही पक्षाच्या राज्यसभेसाठीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत. समाजवादी पक्षाच्या संसदीय मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते शिवपाल यादव यांनी दिली. जाहीर झालेल्या काही नावांबाबत बैठकीत काही नेत्यांनी आक्षेप घेतला, हे खरे आहे का, असे विचारता ते म्हणाले की, असे काही घडलेले नाही. सर्व नावे एकमताने निश्चित करण्यात आली आहेत.

Web Title: Amarsing Rajya Sabha candidate from SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.