अमरसिंह अन्य पक्षात जाण्यासाठी तयार
By admin | Published: February 25, 2017 12:25 AM2017-02-25T00:25:52+5:302017-02-25T00:25:52+5:30
अन्य राजकीय पक्षात जाण्यासाठी आपण चांगली संधी शोधत आहोत, असे सांगत अमरसिंह यांनी आपल्या भावी वाटचालीचे संकेत दिले
नवी दिल्ली : अन्य राजकीय पक्षात जाण्यासाठी आपण चांगली संधी शोधत आहोत, असे सांगत अमरसिंह यांनी आपल्या भावी वाटचालीचे संकेत दिले. अमरसिंह यांना समाजवादी पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. समाजवादी पक्षात पुन्हा परतणार नाही, असेही त्यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. अमरसिंह हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याचे राज्यसभेच्या सचिवालयाने अलिकडेच स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर अमरसिंह यांनी हे मत व्यक्त केले. चांगली संधी म्हणजे नेमके काय? असे विचारले असता
ते म्हणाले की, हा निर्णय घाईगडबडीत नसेल. जुने अनुभव गाठीशी असल्याने विचारपूर्वक निर्णय घेऊ.
अमरसिंह म्हणाले की, मला दोन वेळा सपातून काढण्यात आले. आता पुन्हा या पक्षात परतणार नाही. राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, मी का राजीनामा देऊ. मला मुलायम सिंह यांनी सदस्यत्व दिले आहे.
जर पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी मला राजीनामा देण्यास सांगितले असते तर मी खुशीने राजीनामा दिला असता.
भाजपात सहभागी होण्यासाठी आपण कोणत्याही नेत्यासोबत चर्चा केलेली नाही, असे सांगून अमरसिंह म्हणाले की, माझ्या मनात गांधी कुटुंबाबाबत कोणतीच कटुता नाही. पण, कॅश फॉर व्होटप्रकरणानंतर तुरुंगात जे अत्याचार मी सहन केले आहेत ते विसरू शकत नाही. तेथे मला प्लास्टिकच्या तांब्यातून पाणी प्यावे लागत होते. त्यामुळे काँग्रेसमध्येही अमरसिंह येतील याची शक्यता वाटत नाही.