पोलीस आंदोलन करतात हेच आश्चर्यकारक - केजरीवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:14 AM2019-11-06T03:14:54+5:302019-11-06T03:15:13+5:30
पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री
नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी पोलिसांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले. पोलीसच आंदोलन करतात, ही बाबच आश्चर्यकारक आहे. या आंदोलनामागे कोण आहे? हे स्पष्टपणे दिसून येते. याकडे लक्ष वेधत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे बोट दाखविले.
‘लोकमत’शी बोलताना केजरीवाल म्हणाले, पोलिसांनी आंदोलन करूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. आंदोलन थांबविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या आंदोलनामागे नेमके कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रीय गृहमंत्री शहा कुठे गायब आहेत? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.
पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. पोलीस-वकील यांच्यातील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. वकील हे नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. तर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. या दोन घटकांमुळेच सामान्य नागरिक समाजात आत्मविश्वासाने वावरू शकतात. त्यामुळेच या प्रकरणात आम्हाला तातडीने तोडग्याची आवश्यकता वाटते, असेही सिसोदिया म्हणाले. योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून वाद टाळल्यास पोलीस-वकिलांमधील तणाव दूर करता येईल, असा विश्वास सिसोदिया यांनी व्यक्त केला.
दिल्ली पोलीस म्हणजे भाजपची
सशस्त्र शाखा - आप
आम आदमी पक्षाने दिल्ली पोलिसांच्या आंदोलनावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्ली पोलीस म्हणजे भाजपची सशस्त्र शाखा असल्याचे म्हटले आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिल्ली पोलीस विसरले असल्याचेही आपने म्हटले आहे.