नोकरीची 'अमेझिंग' संधी; अॅमेझॉन इंडियामध्ये 1300 जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 12:56 PM2019-01-14T12:56:49+5:302019-01-14T13:47:00+5:30
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे टेन्शन लवकरच मिटणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय कंपनी 'अॅमेझॉन'मध्ये नोकरीच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे टेन्शन लवकरच मिटणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय कंपनी 'अॅमेझॉन'मध्ये उत्तम नोकरीच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 'अॅमेझॉन' कंपनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या विचारात आहे. पण, केंद्र सरकारच्या अलीकडील कडक धोरणांमुळे 'अॅमेझॉन'सहीत अन्य खासगी कंपन्यांच्या ई-कॉमर्स व्यवसायाला भारतात मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
नोकरीसंदर्भात कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीनं भारतात सर्वाधिक 13,000 जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. चीनच्या तुलनेत भारतामध्ये नोकरीच्या संधी कमीत कमी तीनपटीनं अधिक प्रमाणात आहेत. आशिया- पॅसिफिक प्रादेशिक क्षेत्राबाहेर केवळ जर्मनीमध्ये भारताप्रमाणे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
कुठे आणि किती प्रमाणात आहेत जॉब?
अॅमेझॉन कंपनीने टेक्नॉलॉजीसह निरनिराळ्या पदांसाठी भारतात जवळपास 1,300 नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये अधिकतर बंगळुरू, हैदराबाद आणि चैन्नईमधील प्रतिभाशाली व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, चीनमध्ये 467, जपानमध्ये 381 , ऑस्ट्रेलिया 250 तर सिंगापूरमध्ये 174 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. दरम्यान, 2018च्या अखेरपर्यंत अॅमेझॉनने भारतात 60,000 पदांची भरती केली होती.
अॅमेझॉनचा भारतातील वाढता व्यवसाय
अॅमेझॉन कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. ई-कॉमर्स आणि क्लाउड बिझनेसव्यतिरिक्त अॅमेझॉन कंपनी पेमेंट्स, कंटेट (प्राईम व्हिडीओ), व्हॉईस असिस्टन्ट (अलेक्सा), फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट क्षेत्रांतही आपले नशीब आजमावत आहे.
अॅमेझॉन घेत आहे कौशल्यवान व्यक्तींचा शोध
अॅमेझॉन कंपनीच्या एका महिला प्रवक्त्यानं सांगितले की, भारतातील कौशल्यवान व्यक्तींचा 'अॅमेझॉन'कडून शोध घेतला जात आहे. भारतात असलेल्या 'अॅमेझॉन'च्या टीमकडून व्यवसायातील आव्हानांवर काम केले जात आहे. ही टीम समस्यांवर उपाय शोधण्याचं काम करते. जेणेकरुन भारतासहीत जगभरात अॅमेझॉनचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. पुढे त्यांनी असेही सांगितले की, वाढत्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी हुशार आणि कौशल्यवान व्यक्तींचा शोध घेत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सल्पाय चेन, कन्टेंट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टुडिओ यांसहीत अन्य निरनिराळ्या क्षेत्रांत अॅमेझॉनकडून भारतातील तरुणवर्गासाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.