'अॅमेझॉन'चे वर्चस्व! 'फ्लिपकार्ट'ला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 09:29 AM2018-11-29T09:29:39+5:302018-11-29T09:49:01+5:30
अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅमेझॉनने तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे.
नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू असते. अॅमेझॉन, फिल्पकार्टवर सारख्या कंपन्या सेलमध्ये बड्या ब्रँड्सच्या वस्तूंवर ग्राहकांना मोठी सवलत देत असतात. मात्र आता फिल्पकार्टला मागे टाकत अॅमेझॉनने बाजी मारली आहे. अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे.
अॅमेझॉनने 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. 'बार्कलेज'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून याबाबतची माहिती समोर आली आहे. अॅमेझॉनने पाच वर्षांपूर्वीच देशांतर्गत बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये सातत्याने स्पर्धा पाहायला मिळते.
'बार्कलेज'च्या अहवालानुसार 'ग्रॉस मर्कंटाइझ व्हॅल्यू्' अर्थात 'जीएमव्ही'मध्ये अॅमेझॉनने फ्लिपकार्टला मागे टाकून देशातील सर्वांत मोठी कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. मात्र या अहवालात 'फ्लिपकार्ट'च्या 'जबाँग' आणि 'मिंत्रा' या उपकंपन्यांचा विचार करण्यात आलेला नाही. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 'जीएमव्ही'च्या बाबतीत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यात मोठी स्पर्धा होती. आर्थिक वर्ष 2017-18 अॅमेझॉनने फ्लिपकार्टला मागे टाकल्याचे दिसून आले. 31 मार्चपर्यंत अॅमेझॉनने साडेसात अब्ज डॉलरचा तर फ्लिपकार्टने 6.2 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला आहे.