गांजा विक्रीच्या आरोपाची ॲमेझॉन करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 10:28 AM2021-11-18T10:28:15+5:302021-11-18T10:28:56+5:30
ॲमेझॉनच्या वेबसाईटच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी नुकताच केला आहे.
नवी दिल्ली : आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गांजा विकण्यात येत असल्याच्या आरोपांची आपण चौकशी करीत आहोत, असे ॲमेझॉनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी कायदेपालन संस्थांकडून जो तपास सुरू आहे, त्यातही कंपनी सहकार्य करेल, असेही ॲमेझॉनने म्हटले आहे.
ॲमेझॉनच्या वेबसाईटच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी नुकताच केला आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून तीन राज्यांत १ हजार किलो गांजा पाठविण्यात येत होता, असे पोलिसांनी म्हटले होते. ॲमेझॉनवर कारवाई करण्याची मागणी काईट या व्यापारी संघटनेने केली आहे. ॲमेझॉनने म्हटले आहे की, आम्ही प्रतिबंधित उत्पादनांच्या विक्रीला प्लॅटफॉर्मवर मान्यता देत नाही. तरीही असा काही प्रकार घडला असेल, तर कायद्यानुसार कारवाई करू.