संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 04:15 PM2018-08-18T16:15:10+5:302018-08-18T16:16:58+5:30
ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल.
बेंगळुरूः
अब तो दिन,
रात पे हि आके रुकता है.
मुझे याद है...
पहले एक शाम भी हुआ करती थी.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला हा शेर किंवा 'हाफ-डे'वाला सुपरहिट व्हिडीओ बहुधा अॅमेझॉन-इंडियाच्या प्रमुखापर्यंतही पोहोचला असावा आणि तो त्याच्या मनाला फारच भिडला असावा. कारण, संध्याकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ऑफिसच्या कुठल्याही ई-मेलला किंवा फोनला उत्तर दिलं नाही तरी चालेल, अशी दिलासादायक मुभा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचं समजतं. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 'टार्गेट'च्या मागे पळवत असताना, त्यांच्यावर अधिकाधिक वेळ आणि जास्तीत जास्त काम करण्यासाठी दबाव आणत असताना अॅमेझॉन इंडियानं हे पाऊल उचलल्यानं आश्चर्य आणि आनंद व्यक्त होतोय.
भारतातील अॅमेझॉनचे प्रमुख - कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांचा एक ई-मेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 'शाम अपनी जिंदगी के नाम' करण्याची मंत्रच त्यांनी या ई-मेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल, या काळात कंपनीच्या ई-मेलला किंवा फोनला उत्तर देणं बंधनकारक नसेल, अशी सवलत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलीय. ब्लूमबर्गच्या एका अहवालातही या ई-मेलचा उल्लेख आहे. हा मेल महिन्याच्या सुरुवातीला पाठवल्याचं बोललं जातंय. अर्थात, अॅमेझॉनतर्फे याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कर्मचाऱ्यांना राबवून घेणारी कंपनी, अशीच काहीशी अॅमेझॉनची ओळख आहे. कंपनीचे संस्थापक-सीईओ जेफ बेजॉस हेही शिस्तीचे आणि कडक बॉस आहेत. अमित अग्रवाल हे त्यांचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होते. त्यामुळे त्यांनाही कामात कुठलीही हयगय चालत नाही. असं असतानाही, त्यांनी कर्मचाऱ्यांना एवढी मोठी खुशखबर दिल्यानं सगळेच अवाक झालेत.
अॅमेझॉन भारताकडे मोठ्ठी बाजारपेठ म्हणून पाहतं. तब्बल ५.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचं नियोजन कंपनीने केलं आहे. त्यामुळे कामाचा व्याप किती मोठा असेल, याची आपण कल्पना करू शकतो. परंतु, कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण येऊ नये आणि त्यांनी कामाच्या वेळेत पूर्ण उत्साहाने काम करावं, यादृष्टीने कंपनीने त्यांची संध्याकाळ सुखाची केल्याचं बोललं जातंय.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण टार्गेटचं ओझं घेऊन वावरतोय. ना झोप पूर्ण होते, ना जेवणाच्या वेळा पाळल्या जातात. ही जीवनशैली वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक आजारांना आमंत्रण ठरतेय. त्याची योग्य वेळी दखल घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना थोडा अवधी देणं, उसंत देणं अत्यावश्यक आहे. सगळ्याच कंपन्यांनी तसा विचार करायला हवा.