अंबानींनी पुन्हा लिहिलं राहुल गांधींना पत्र, राफेल करारातील सर्व आरोपांचं केलं खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:53 AM2018-08-21T10:53:59+5:302018-08-21T10:54:12+5:30
राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
नवी दिल्ली- राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राफेल करारावरून राहुल गांधी मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच या राफेल कराराच्या माध्यमातून अनिल अंबानींना मोदींनी फायदा पोहोचवून दिल्याच्याही राहुल गांधींनी आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांनी राहुल गांधींना दुसरं पत्र लिहिलं आहे.
पत्रात ते लिहितात, काही खासगी स्वार्थासाठी आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धेसाठी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच पहिल्या पत्रातही अनिल अंबानींनी राहुल गांधींच्या एका एका मुद्द्याचं निरसन करत खंडन केलं होतं. तसेच काँग्रेस रिलायन्स समूहावर करत असलेल्या आरोपांमुळे अतीव दुःख होत असल्याची भावनाही अनिल अंबानींनी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी 12 डिसेंबर 2017 रोजी अनिल अंबानींनी राहुल गांधींना पहिली पत्र लिहिलं होतं. आमच्याकडे संरक्षण जहाज बनवण्याचा अनुभव असल्यानेच रिलायन्स समूहाला हा करार प्राप्त झाला आहे. दुस-या पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले आहेत. राफेल ही लढाऊ विमानं रिलायन्स आणि दसॉ संयुक्तरीत्या तयार करणार नाहीत.
सर्व 36 विमानांचं 10 टक्के निर्माण हे फ्रान्समध्ये होणार आहे. त्यानंतर फ्रान्स ती विमानं भारताला निर्यात करणार आहे. एडीएजी समूहाकडे विमान बनवण्याचं कौशल्य नसताता त्यांना 45 हजार कोटींचा फायदा पोहोचवण्यात आला, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना अनिल अंबानी म्हणाले, 36 राफेल विमानांचं एकही पार्ट भारतात रिलायन्स समूहाद्वारे बनवला जाणार नाही. ती सर्व विमानं फ्रान्समध्ये तयार होणार आहेत. आम्ही फक्त निर्यातीमध्ये सहभागी राहणार आहोत, असंही अंबानींनी स्पष्ट केलं आहे.