आंबेडकर हे राजकीय अस्पृश्यतेचे बळी-मोदी
By admin | Published: April 21, 2015 12:23 AM2015-04-21T00:23:39+5:302015-04-21T00:23:39+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय अस्पृश्यतेचे बळी ठरलेले आहेत. त्यांनी स्वबळावर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपला विकास साधला
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय अस्पृश्यतेचे बळी ठरलेले आहेत. त्यांनी स्वबळावर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपला विकास साधला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीच्या जनपथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते.
देशाच्या या पहिल्या कायदा मंत्र्याने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपला देह झिजविला. डॉ. आंबेडकर झाले नसते तर नरेंद्र मोदी तरी आज येथे असता काय? या सुधारकाला आपल्या जीवनात सामाजिक अस्पृश्यतेचा सामना करावा लागला व निधनानंतर राजकीय अस्पृश्यतेचा सामना करावा लागत आहे.
१९९२ मध्ये हे स्मारक बांधून पूर्ण करण्याचा आंबेडकरांच्या अनुयायांचा विचार होता. परंतु तब्बल २० वर्षेपर्यंत संबंधित फायली मागे-पुढे सरकत राहिल्या. जेव्हा ही जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा हा विलंब झालेला पाहून मी अस्वस्थ झालो. परंतु २० वर्षे वाया गेली असली तरी आता २० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. एका अर्थाने हे स्मारकही राजकीय अस्पृश्यतेचा बळी ठरले आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)