दररोज 45 किमी रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट्य अजून स्वप्नवतच; प्रतिदिन 26 किमी रस्त्यांचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 11:41 AM2018-07-10T11:41:50+5:302018-07-10T11:42:20+5:30
संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या चार वर्षांमध्ये 73 टक्के रस्ते जास्त बांधले आहेत.
नवी दिल्ली- या आर्थिक वर्षामध्ये दररोज 45 किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे केंद्रीय भूपृष्ठवहन मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष्य प्रत्यक्षात येणं अद्याप शक्य दिसत नाही. एप्रिल ते जून महिन्यात दररोज 25 किमी या वेगाने भारतात रस्ते बांधले गेले तर आता ही गती रोज 26 किमी इतकी झाली आहे.
या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये 2345 किमी लांबीचे रस्ते बांधले गेले. गेल्य़ा वर्षी याच कालावधीमध्ये 2260 किमी रस्ते बांधण्यात आले. नॅशनल हायवे अथॉरिटीने दररोज 8.3 किमी वेगाने रस्ते बांधले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 892 किमी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 1054 किमी रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली होती.
संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या चार वर्षांमध्ये 73 टक्के रस्ते जास्त बांधले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये 16 हजार 505 किमी लांबीचे रस्ते बांधले गेले तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या चार वर्षांमध्ये 28,531 किमी लांबीचे रस्ते बांधले आहेत.