हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने आजारी आईला हातगाडीवरून रुग्णालयात घेऊन गेला लेक पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 08:02 PM2022-08-17T20:02:37+5:302022-08-17T20:10:26+5:30
रुग्णवाहिका आणि उपचार वेळेवर मिळाले असते तर आईचा मृत्यू झाला नसता, मात्र रुग्णवाहिका नसल्यामुळे तिच्या आजारी आईला जीव गमवावा लागला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने एका मुलावर त्याच्या आजारी आईला हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगा आजारी वृद्ध आईला हातगाडीवर ठेवून 4 किमी अंतर पायी प्रवास करत रुग्णालयात पोहोचला, पण तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका आणि उपचार वेळेवर मिळाले असते तर आईचा मृत्यू झाला नसता, मात्र रुग्णवाहिका नसल्यामुळे तिच्या आजारी आईला जीव गमवावा लागला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जलालाबाद शहरात ही भयंकर घटना घ़डली. याच ठिकाणी राहणाऱ्या दिनेश याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची वृद्ध आई बिना देवी यांच्या अचानक पोटात दुखू लागले. दिनेशच्या फोनमध्ये बॅलन्स नव्हता. त्याने शेजाऱ्यांना विनंती करून 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेला बोलवण्याची विनंती केली, मात्र कोणीही फोन केला नाही.
दिनेशकडे पैसेही नव्हते. त्याच्या आईला खूप वेदना होत होत्या. त्यामुळे त्याने आईला हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. 4 किलोमीटर चालत तो रुग्णालयात पोहोचला, मात्र रस्त्यातच त्याच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला.
आईला हातगाडीवर चढवून तब्बल 4 किलोमीटरचा प्रवास करून तो जलालाबादच्या शासकीय रुग्णालयात पोहोचला, मात्र याच दरम्यान त्याच्या आईचा रस्त्यात मृत्यू झाला. रुग्णालयाचे डॉक्टर अमित यादव यांनी हातगाडीवर असलेल्या आईला पाहिले पण वाटेतच आईचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.