अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणारच, मुदतवाढ नाही, सहाराची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:20 AM2017-09-12T04:20:45+5:302017-09-12T04:21:23+5:30
भरायला सांगितलेल्या १,५०० कोटी रुपयांपैकी शिल्लक राहिलेली ९६६ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना नकार दिला.
नवी दिल्ली : भरायला सांगितलेल्या १,५०० कोटी रुपयांपैकी शिल्लक राहिलेली ९६६ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना नकार दिला. तसेच रक्कम वसूल करण्यासाठी सहाराच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील ‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव करण्याची पुढील प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने पुढे सुरु करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने १,५०० कोटी रुपये जमा करण्यासाठी सहाराला ७ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यापैकी ९६६ कोटी रुपये मुदतीत जमा करता न आल्याने रॉय यांच्यावतीने ११ नोव्हेंबर या पुढच्या तारकेचा चेक दिला गेला व तोपर्यंत मुदत वाढविण्याची विनंती केली गेली. मात्र असा पुढील तारखेचा चेक स्वीकारून मुदत वाढवून देणे म्हणजे न्यायाची थट्टा करणे होईल, असे सांगून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्यास नकार दिला.
रॉय यांची खरडपट्टी काढताना सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही न्यायालयास आपल्या मर्जीप्रमाणे खेळवू पाहात आहात. जितके दिवस ‘व्हेंटिलेटर’वर जितके जिवंत राहता येईल तेवढे राहण़्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात. परंतु केव्हा ना केव्हा तरी ‘व्हेंटिलेटर’ काढावा लागेल व तेव्हा फक्त कलेवर शिल्लक उरेल, याचे भान ठेवा.
‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने ३७,३९२ कोटी रुपये राखीव किंमत ठरवून अॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी बोली मागविणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता न्यायालायने हिरवा कंदील दाखविल्याने येणाºया बोलींची छाननी करून प्रत्यक्ष लिलावाची पुढील प्रक्रिया सुरु होऊ शकेल.