‘अॅम्बी व्हॅली’चा होणार लिलाव
By admin | Published: April 18, 2017 05:32 AM2017-04-18T05:32:15+5:302017-04-18T05:32:15+5:30
गुंतवणूकदारांचे देणे चुकते करण्यास सहारा उद्योगसमूहाच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील ‘अॅम्बी व्हॅली’ ही मालमत्ता लिलावात विकून
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे देणे चुकते करण्यास सहारा उद्योगसमूहाच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील ‘अॅम्बी व्हॅली’ ही मालमत्ता लिलावात विकून पैसे वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
सहाराने गुंतवणूकदारांचे १४ हजार कोटी रुपये अद्याप परत करायचे आहेत. त्यापैकी पाच हजार कोटी रुपये १७ एप्रिलपर्यंत ‘सेबी’कडे जमा न केल्यास अॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारला जाईल, असे न्यायालयाने याआधी बजावले होते. सहाराने कबूल केल्याप्रमाणे पैसे जमा न केल्याने न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने लिलावाची कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला.
अॅम्बी व्हॅलीचा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ कार्यालयामार्फत करण्यात येईल. सहाराच्या वकिलांनी अॅम्बी व्हॅलीसंबंधीची सर्व आवश्यक माहिती दोन दिवसांत ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ना द्यावी आणि त्या कार्यालयाने १० दिवसांत या मालमत्तेचे मूल्यांकन करून लिलावाची कारवाई कायद्यानुसार सुरू करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. गेल्या फेब्रुवारीत न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीवर टांचही आणली होती.
सहारा रिअल इस्टेट आणि सहारा हाऊसिंग या सहारा समूहातील दोन कंपन्यांनी बेकायदा योजना राबवून गोळा केलेले २५ हजार कोटी रुपये व्याजासह ‘सेबी’च्या माध्यमातून परत करावे, असा आदेश न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये दिला होता. तरीही पैसे दिले नाहीत म्हणून न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि दोन संचालकांना तुरुंगात टाकले. अजूनही सहाराने १४ हजार कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत. ‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव होऊ नये असे वाटत असेल, तर इतर मालमत्ता विकून पैसे जमा करा, असे वारंवार सांगून आणि त्यासाठी अनेक वेळा मुदत देऊनही सहाराने रक्कम भरली नाही त्यामुळे अखेरीस ‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव पुकारण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)