अमेरिकेने केले भागवत यांच्या भूमिकेचे कौतुक; धार्मिक स्वातंत्र्य अहवालात उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:31 AM2023-05-17T09:31:52+5:302023-05-17T09:32:11+5:30
२०२१ मध्ये भागवत यांनी एका कार्यक्रमात, देशातील हिंदू आणि मुस्लीम समाजासोबत धर्माच्या आधारावर व्यवहार करणे चुकीचे असून, गोहत्येसाठी हिंदू सोडून इतरांची हत्या करणे हे हिंदुत्वाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
वॉशिंग्टन : भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू- मुस्लीम सौहार्द वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवालात करण्यात आला आहे.
२०२१ मध्ये भागवत यांनी एका कार्यक्रमात, देशातील हिंदू आणि मुस्लीम समाजासोबत धर्माच्या आधारावर व्यवहार करणे चुकीचे असून, गोहत्येसाठी हिंदू सोडून इतरांची हत्या करणे हे हिंदुत्वाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, रशिया, भारत, चीन आणि सौदी अरेबियासह अनेक देशांतील सरकारे उघडपणे धार्मिक समुदायांच्या सदस्यांना लक्ष्य करत आहेत, असेही मत अहवालात व्यक्त केले गेले आहे.
परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी अहवाल जारी केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कार्यालयाचे विशेष दूत रशद हुसैन यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, अनेक देश उघडपणे आपल्या हद्दीत धार्मिक समुदायांच्या सदस्यांना लक्ष्य करीत आहेत.
कायद्याचे वकील आणि भारतातील विविध धार्मिक समुदायांशी संबंधित धार्मिक नेत्यांनी हरिद्वार शहरातील मुस्लिमांविरुद्ध उघड द्वेषयुक्त भाषणाच्या प्रकरणांचा निषेध केला आहे आणि देशाला सहिष्णुतेची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले.
काय आहे अहवालात?
अनेक राज्यांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या सदस्यांविरुद्ध अधिकाऱ्यांनी हिंसाचार केल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत, ज्यात गुजरातमध्ये एका उत्सवादरम्यान पोलिसांनी हिंदू उपासकांना जखमी केले. यावेळी मारहाणही करण्यात आली. मध्य प्रदेश सरकारने रगोनमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाची घरे आणि दुकानांवर बुलडोझर चालवल्याचा उल्लेखही अहवालात आहे.