भारताची स्वदेशी लस 'COVAXIN' ला अद्याप का मिळत नाही मंजुरी?; WHO ने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:15 PM2021-10-22T20:15:42+5:302021-10-22T20:24:48+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंजुरी मिळण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची (COVAXIN ) प्रतीक्षा वाढतच चालली आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून व्हायरस पुढे हतबल झाले आहेत. रुग्णसंख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 243,397,606 वर पोहोचली आहे. तर 4,947,807 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान सर्वच देशात वेगाने लसीकरण देखील सुरू करण्यात आलं आहे. मात्र याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंजुरी मिळण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची (COVAXIN ) प्रतीक्षा वाढतच चालली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून अद्याप देखील या कोरोना लसीला मान्यता का मिळत नाही, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेकडूनच याबाबत मोठा खुलासा करण्यात आला असून लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया ही विलंबाचीच असल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही कोरोना लसीला मान्यता देण्याची प्रक्रिया ही प्रचंड गुंतागुंतीची असते. लसीचं पूर्ण परिक्षण आणि मूल्यांकन झाल्याशिवाय कुठल्याही लसीला मान्यता दिली जात नाही.
26 ऑक्टोबरला लसीला मान्यता देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक
एखाद्या लसीला मिळणारी मान्यता हा कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असतो. त्यामुळे सर्व निकष तपासून पाहणं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरील चाचण्यांच्या निष्कर्षाचं पृथक्करण करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असल्याचं रेयान यांनी सांगितलं आहे. लोकांना योग्य सल्ला देणं अत्यंत गरजेचं आहे. भलेही यासाठी एक किंवा दोन आठवडे अधिक लागले तरी चालेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची 26 ऑक्टोबरला लसीला मान्यता देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लसीला मान्यता देण्यात येऊ शकते का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला होता.
कोवॅक्सिनला लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी या प्रश्नाला उत्तर देताना असं कोणतंही आश्वासन देण्यास नकार दिला आहे. 26 तारखेला भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिनला आपात्कालीन वापराच्या यादीत टाकण्याच्या निर्णयाबाबत चर्चा होणार आहे. मात्र इतर अनेक गोष्टींवर याचा निर्णय अवलंबून असेल, असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मागितले जाणारे सर्व तपशील आम्ही पुरवत असून लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा भारत बायोटेककडून व्यक्त करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.