“ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:23 AM2023-04-05T08:23:07+5:302023-04-05T08:24:50+5:30
उद्धव ठाकरे गटाची जोरदार टीका.
‘पंतप्रधान मोदी यांचे सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने केलेले भाषण भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे, आमच्या विरोधकांना सोडू नका, असा संदेश देणारे आहे,’ असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
‘सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांची प्रतिष्ठा मागील सात-आठ वर्षांत साफ धुळीस मिळाली आहे व त्या यंत्रणांना स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन अद्यापि निर्माण व्हायचे आहे. मोदी यांच्या भाषणांमुळे अदानी वगैरे भाजप मंडळींचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. कारवाया व अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील,’ असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीकेचा बाण सोडलाय.
काय म्हटलेय संपादकीयमध्ये ?
‘अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल,’ असे संपादकीयमध्ये म्हटले आहे.
सीबीआय म्हणजे मोदी-शहांच्या पिंजऱ्यातला पोपट
‘देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही. भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्या विरोधात न घाबरता कारवाई करा,’ अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत. कोणत्याही भ्रष्टाचाऱयाला वाचवू नका आणि पाठीशीही घालू नका, असे मोदी म्हणत असले तरी सीबीआय म्हणजे मोदी-शहांच्या पिंजऱ्यातला पोपट आहे याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी,’ असे यात नमूद केलेय.
आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली
‘एकेकाळी सीबीआय म्हणजे ‘काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली व सीबीआयचा पोपट पिंजऱ्यातच मालक सांगेल त्याप्रमाणे ‘विटू विटू’ किंवा ‘मिठू मिठू’ करीत आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा आज मोदींच्या ढवळय़ा-पवळ्याप्रमाणेच काम करत असल्याचा आरोप यात करण्यात आलाय.