अरे व्वा! कोट्यवधींची नोकरी सोडली, निवडणूक लढवण्यासाठी 'तो' थेट अमेरिकेतून आला गावी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:05 PM2023-10-30T13:05:08+5:302023-10-30T13:12:03+5:30

तरुण आर्किटेक्ट असून अमेरिकेत वर्षाला कोट्यवधींचं पॅकेज घेऊन काम करत होता.

america returned prakhar pratap singh is contesting elections from gurh assembly of rewa district | अरे व्वा! कोट्यवधींची नोकरी सोडली, निवडणूक लढवण्यासाठी 'तो' थेट अमेरिकेतून आला गावी

फोटो - आजतक

बदलत्या काळानुसार राजकारणाचा रंगही बदलत असतो. राजकारणात येण्यासाठी काही जण आयुष्यभर धडपडत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील रीवा येथे पाहायला मिळत आहे. निवडणूक लढवण्यासाठी सातासमुद्रापार एक तरुण अमेरिकेतून आपल्या रीवा गावात आला आहे. त्याने गावात येऊन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज केला आहे. हा तरुण आर्किटेक्ट असून अमेरिकेत वर्षाला कोट्यवधींचं पॅकेज घेऊन काम करत होता.

रीवा जिल्ह्यातील गुढ विधानसभा सध्या चर्चेत आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत उतरलेल्या तरुण नेत्याची चर्चा आहे. 25 वर्षीय प्रखर प्रताप सिंह हा मूळचा रीवा जिल्ह्यातील रायपूर कर्चुलियनचा रहिवासी आहे. डेहराडून येथील प्रसिद्ध दून स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो अमेरिकेला गेला. अमेरिकेत आर्किटेक्टची पदवी आणि इटलीमध्ये मास्टर डिग्री मिळवली. 

पदवी पूर्ण करताच प्रखर प्रताप सिंह याला एक कोटी रुपयांच्या पॅकेजसह अमेरिकेत नोकरी मिळाली. पण देशाच्या मातीचा गंध, गावाच्या आठवणी, गरिबांच्या वेदना त्याच्या मनात ताज्या राहिल्या. त्याने अमेरिकेत उपस्थित असलेल्या इंडियन सोसायटीतील काही भारतीय नेत्यांची भेट घेतली आणि या भेटीने त्याला नव्या वाटेवर चालण्याची उमेद दिली. 

निवडणूक लढवून जनतेची सेवा करण्याचा त्याचा ठाम मानस होता. याआधी प्रखर प्रताप सिंह याच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात आले नव्हते. त्याचा उत्साह पाहून आम आदमी पक्षाने त्याला उमेदवार केलं आहे. आप उमेदवाराचे वडील भानू सिंह म्हणतात की, प्रखर लहानपणापासूनच खूप आशावादी होता. अभ्यासात त्याला आवड होती. त्याने अमेरिका आणि नंतर इटली असा प्रवास केला. 

चांगले पॅकेज मिळाल्यानंतर प्रखरला अमेरिकेत राहण्याचा सल्ला देण्यात आला. पण त्याने समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. प्रखर सांगतो की, त्याच्या विधानसभेत अनेक समस्या आहेत, गरिबांच्या छोट्या-छोट्या गरजा आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांचे राहणीमान सुधारावं आणि लोक सुखी व्हावेत यासाठी काम करणे हे माझं उद्दिष्ट आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: america returned prakhar pratap singh is contesting elections from gurh assembly of rewa district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.