रुग्णालयानं सांगितलं उपचारासाठी फक्त 1 लाख रुपये लागतील, हातात दिलं तब्बल 2.3 कोटींचं बिल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:57 PM2022-05-20T17:57:02+5:302022-05-20T17:57:57+5:30
अमेरिकेत उघडकीस आलेल्या या घटनेतील महिलेला तब्बल 2 कोटी रुपयांहूनही अधिकचे बिल पाठवण्यात आले होते.
एका रुग्णालयाने आपल्या महिला रुग्णाला तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांहूनही अधिकचे (3,03,709 अमेरिकन डॉलर) बील दिल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत समोर आली आहे. खरे तर, या महिलेला आपल्या सर्जरीसाठी केवळ 1 लाख रुपये, म्हणजेच 1300 अमेरिकन डॉलरच द्यायचे होते. यासंदर्भात, तेथील सर्वोच्च न्यायालयानेही आता या महिलेच्या बाजूने निर्णय दिला आहे. खरे तर, या रुग्णालयाने सबंधित महिलेच्या बिलात काही असे चार्ज लावले, ज्यांबद्दल महिलेला आधी कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती.
अमेरिकेत उघडकीस आलेल्या या घटनेतील महिलेला तब्बल 2 कोटी रुपयांहूनही अधिकचे बिल पाठवण्यात आले होते. याप्रकरणी कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला. या महिलेने सबअर्बन डेनव्हेर हॉस्पिटलमध्ये स्पायनल फ्यूजन सर्जरी केली होती. लिजा फ्रेंच असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी 2014 मध्ये स्वतःच्या दोन सर्जरी करवल्या होत्या.
सीबीसीच्या वृत्तानुसार, वेस्टमिंस्टरमधील 'सेंट एंथनी नॉर्थ हेल्थ कॅम्पस' फ्रेंच यांना एक्सट्रा चार्ज देण्यासाठी बळजबरी करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बिलाच्या नावावर नेमके काय झाले?
फ्रेंच यांना आपल्या उपचारासाठी साधारणपणे 1 लाख रुपये द्यायचे होते. पण, त्यांचे बील 2 कोटी 35 लाख रुपयांहूनही अधिक झाले होते. तर, इंश्योरन्स कंपनीने त्यांना केवळ 57 लाख रुपयेच (74,000 अमेरिकन डॉलर) दिले होते.