'गदर... एक देशप्रेमकथा'; अमेरिकेतील शाळांच्या पाठ्यपुस्तकात भारतीय स्वातंत्र्याचा धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:46 PM2018-07-17T15:46:13+5:302018-07-17T15:47:05+5:30
अमेरिकेतील विद्यार्थ्यांना मिळणार भारतीय इतिहासाची माहिती
नवी दिल्ली: अमेरिकेतील शाळांच्या पुस्तकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचा समावेश केला जाणार आहे. अमेरिकेच्या अॅस्टोरिया शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. गदर पक्षाशी संबंधित इतिहास अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवण्यात येईल, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गदर पक्षाच्या स्थापनेला 105 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ओरेगनमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी गदर पक्षानं केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली होती. कॅनडा आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी 1913 मध्ये गदर पक्षाची स्थापना केली होती. सरदार सोहन सिंह भाकना यांनी या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतं. 21 एप्रिल 1913 रोजी अमेरिकेत गदर पक्षानं 'गदर' नावाचं साप्ताहिक सुरु केलं होतं. याची जबाबदारी करतार सिंह सराभा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या साप्ताहिकात देशभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या कविता प्रसिद्ध व्हायच्या.
लाला हरदयाल यांच्या विचारांनी गदर पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या विस्तारासाठी ते अमेरिकेला गेले होते. अमेरिकेतील भारतीयांना पक्षाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. इंग्रजांविरोधात बंड करण्यासाठी गदर पक्षानं 21 फेब्रुवारी 1915 हा दिवस निश्चित केला होता. मात्र किरपाल सिंह यांनी गद्दारी करुन याबद्दलची माहिती ब्रिटिशांना दिली. याची कल्पना क्रांतीकारकांना मिळताच त्यांनी बंडाची तारीख 19 फेब्रुवारी केली. मात्र याचीही माहिती इंग्रजांपर्यंत पोहोचल्यानं क्रांतीकारकांची धरपकड करण्यात आली.