फेसबूकवरील मानसपुत्राच्या लग्नासाठी अमेरिकन आई भारतात
By admin | Published: January 30, 2016 02:14 PM2016-01-30T14:14:21+5:302016-01-30T14:22:32+5:30
फेसबूकवरील मानसपुत्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकन महिला चक्क भारतात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
गोरखपूर ( उत्तर प्रदेश), दि. ३० - मनोरंजन किंवा टाईमपाससाठी सोशल नेटवर्किंग साईट्स वापरणा-यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतानाच फेसबूकमुळे अनेकांची जन्माची नातीही जोडली जातात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील एका तरूणाला आला असून फेसबूकमुळे त्याला चक्क अमेरिकेतील एक आई मिळाली. आणि त्यांनी त्याच्या लग्नासाठी भारतात हजेरी लावली.
गोरखपूरमधील कृष्णमोहन त्रिपाठी हा डॉक्टर राममनोहर लोहिया विश्वविद्यालयात एम कॉम करतो. फेसबुकवर सर्फिंग करताना काही वर्षांपूर्वी त्याची ओळख अमेरिकेतील डिबरा एन मिलर (वय ६०) या वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित काम करणा-या महिलेशी झाली. फेसबूकवरून गप्पा मारता मारता त्या दोघांमध्ये छान मैत्री झाली. असंच बोलता बोलता डिबरा यांनी आपल्याला अपत्य नसल्याचं दु:ख त्याच्यासमोर व्यक्त केलं असता कृष्णमोहनने त्यांना मी तुम्हाला माझ्या आईप्रमाणे मानत असल्याचं सांगितलं. त्याच्या या शब्दांमुळे आनंदित झालेल्या डिबरा यांनीही कृष्णमोहनला आपला मुलगा मानलं आणि त्यांच्यातील माय-लेकराचं नात दिवसेंदिवस अधिक गहिरं झालं.
लग्नाचे निमंत्रण मिळताच डिबरांनी गाठला भारत
२९ जानेवारी रोजी कृष्णमोहनचे लग्न होणार होतं आणि त्यासाठी आपल्या या आईने उपस्थित रहावं अशी इच्छा त्याने डिबरांसमोर व्यक्त केली. डिबरा यांना आपल्या या मानसपुत्राचं मन मोडवलं नाही आणि त्यांनी २५ जानेवारीलाच गोरखपूर गाठलं. एका भारतीय मुलाच्या लग्नासाठी अमेरिकन आईने लावलेली हजेरी हा इतका चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला की आसपासच्या गावातील लोकांनीही डिबरा यांना पाहण्यासाठी लग्नाला हजेरी लावली.
लग्नात दिली १२५ वर्षांपूर्वीची अंगठी भेट
डिबरा यांनी लग्नात खूप धमाल मस्ती केली. पोटच्या मुलाचं लग्न असल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. या लग्नासाठी त्या खास भारतीय पोषाखातच उपस्थित होत्या. आपल्या या लाडक्या मानसपुत्राच्या लग्नात भेट म्हणून एक खास वस्तू आणली.. ती म्हणजे तब्बल १२५ वर्षांपूर्वीची एक सुंदर अंगठी. एका लिलावात खरेदी केलेली ही अंगठी त्यांनी कृष्णमोहनच्या पत्नीला भेटीदाखल दिल्याने सर्वजण भारावून गेले.