लष्कराचे सामर्थ्य वाढणार, जवानांना मिळणार 70,000 हून अधिक सिग सॉर रायफल्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:03 PM2023-12-13T14:03:54+5:302023-12-13T14:04:53+5:30
दहशतवादविरोधी कारवाया आणि इतर कर्तव्यात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना या रायफल्स दिल्या जातील.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी भारत सरकारने मोठी तयारी केली आहे. भारतीय लष्कराला 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 70,000 हून अधिक सिग सॉर असॉल्ट रायफल्स खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, भारताचा चीनसोबत लष्करी संघर्ष आणि पाकिस्तान जम्मू-काश्मीरजवळील नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी कारवाया यादरम्यान ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.
दहशतवादविरोधी कारवाया आणि इतर कर्तव्यात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना या रायफल्स दिल्या जातील. संरक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या खरेदीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत लष्कराचे उच्च अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भारताने यापूर्वीच असॉल्ट रायफल्सपैकी 70,000 हून अधिक रायफल्स समाविष्ट केल्या आहेत, ज्या लडाख सेक्टरमध्ये आणि काश्मीर खोऱ्यात चीनच्या आघाडीवर लष्कराकडून वापरल्या जात आहेत.
लांब पल्ल्याच्या रायफल्स हव्या असल्याने लष्कराने सुरुवातीला या रायफल्स खरेदी करण्याचा विचार केला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकेच्या Sig Sauer कंपनीकडून 72,400 SIG 716 रायफल्स खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 66,400 लष्करासाठी 4,000 हवाई दलासाठी आणि 2,000 नौदलासाठी होत्या. सिग 716 असॉल्ट रायफल उच्च क्षमता आणि विस्तारित रेंजमुळे निवडली आहे.
SIG 716 रायफल्स या अमेरिकन कंपनी Sig Sauer द्वारे तयार केल्या जातात. ही कंपनी जगातील सर्वोत्तम रायफल बनवण्यासाठी ओळखली जाते. भारतीय लष्कर सामान्यतः AK-47 चा वापर करत आहे. याशिवाय, INSAS देखील दीर्घकाळ वापरला जात आहे. काश्मीरमधील दहशतवादी यापूर्वीच 300 मीटरपर्यंतच्या AK-47 चा वापर करत आहेत. म्हणजे दोन्ही बाजूंनी समान श्रेणीच्या रायफल्स वापरल्या जात होत्या.
रायफलची खासियत
- कॅलिबर : 7.62 NATO
- बॅरल लेंथ : 16 इंच
- बॅरल मॅटेरियल : कार्बन स्टील
- रेंज : 600 मीटर
- मॅगजिन टाइप : AR-10
- अॅक्शन टाइप : सेमी ऑटो
- स्टॉक टाइप : टेलिस्कोपिक
- ट्रिगर टाइप : सिंगल स्टेज पॉलिश्ड/हार्ड कोट
- ट्विस्ट रेट: 1:10
- फोरएंड टाइप : अलॉय
- ग्रिप टाइप : पॉलिमर
- ओवरऑल लेंथ : 37 इंच
- ओवरऑल विड्थ : 2.5 इंच
- हाइट : 8 इंच
- वजन : 3.85 किलोग्राम