बालमजुरी विरोधातील भारताच्या प्रयत्नांची अमेरिकेकडून प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:41 AM2018-09-23T04:41:06+5:302018-09-23T04:41:43+5:30
घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन - घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या श्रम विभागाच्या वतीने शनिवारी वार्षिक ‘बालमजुरी आणि बेठबिगारी अहवाल’ जारी करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले आहे की, यंदा अत्यंत कठोर निकष लावून जगातील १३२ देशांच्या बालमजुरी निवारणाच्या प्रयत्नांचा अभ्यास करण्यात आला आहे. या निकषांचे पालन केवळ १४ देशांनीच केल्याचे दिसून आले आहे. कोलंबिया, पॅराग्वे आणि भारत यांचा त्यात समावेश आहे. ठराविक कायदेशीर आणि धोरणात्मक निकषांचा त्यात समावेश होता. अहवालानुसार घातक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काम करण्यावर बंदी घालण्यासाठी भारत सरकारने आपल्या बालमजुरी कायद्यात सुधारणा केली आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या १८२ व १३८ परिषदेने संमत केलेल्या ठरावानुसार, भारताने हे बदल केले आहेत. याशिवाय बालमजुरी रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्याची तसेच राष्ट्रीय बालमजुरी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने एक प्लॅटफॉर्म तयार केला.
बालमजुरी संपलेली नाही
अहवाल म्हणतो की, सरकारने चांगले प्रयत्न केले असले तरी भारतातील बालमजुरी अजून संपलेली नाही. घातक स्वरूपाच्या व्यवसायात अजूनही मुलांना कामाला जुंपले जाते. बालकांना बेठबिगार म्हणूनही राबवून घेतले जाते.