CoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी; शेकडोंच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची बिर्याणी पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 11:53 AM2020-04-11T11:53:34+5:302020-04-11T11:56:20+5:30
CoronaVirus पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भाजपा आमदाराकडून हरताळ
बंगळुरू: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. मात्र तरीही कित्येकांना याचं गांभीर्य समजलेलं नाही. यामध्ये भाजपाच्या काही नेत्यांचादेखील समावेश आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान आणि प्रशासनाकडून केलं जात असताना काही जण त्याला हरताळ फासत आहेत. कर्नाटकच्या टुमकूरमध्ये असाच एक प्रकार पाहायला मिळाला.
कर्नाटकच्या टुमकूरचे भाजपा आमदार एम. जयराम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिर्याणी पार्टी दिली. गुब्बी शहरातील लोक मोठ्या संख्येनं या पार्टीला जमले होते. विशेष म्हणजे सरकारी शाळेत त्यांनी ही पार्टी दिली. जयराम यांच्या पार्टीला उपस्थित असलेल्या अनेकांनी फेस मास्क घातला होता. मात्र त्यांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी गर्दी टाळा, कार्यक्रमाचं आयोजन करू नका, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी अनेकदा केल्या आहेत. मात्र भाजपाच्याच काही नेत्यांनीच त्यांच्या सूचना गांभीर्यानं घेतल्या नसल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं.
Karnataka: BJP MLA from Turuvekere M Jayaram today celebrated his birthday with villagers in Gubbi taluk, Tumkur, during lockdown for prevention of COVID19 transmission. pic.twitter.com/nNSpPLTBmU
— ANI (@ANI) April 10, 2020
कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २०७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १६७ जणांवर सध्या उपचार सुरू असून ३४ जणांची प्रकृती सुधारली आहे. राज्यात आतापर्यंत ६ जणांना कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे सात हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे २४९ जणांना जीव गमवावा लागला आहे.