महागाई नियंत्रणात ठेवण्यात यश; मंदीचीही शक्यता नाही - अर्थमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:33 AM2022-08-02T11:33:58+5:302022-08-02T11:36:05+5:30
Nirmala Sitharaman : आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले.
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.
सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले. सरकारच्यावतीने उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, सध्या जगभरात काय चालले आहे आणि भारताचे जगात काय स्थान हे, पहायला हवे. जगाने कोरोना आजाराचा सामना यापूर्वी कधीही केला नव्हता. महामारीतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जण आपल्या स्तरावर काम करत आहे. त्यामुळेच अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम राहिली आहे.
अमेरिकेच्या विकास दरात दुसऱ्या तिमाहीमध्येही ०.९ टक्क्यांची घसरण आली आहे. त्याला त्यांनी मंदीचे संकेत म्हटले आहेत. तेथील महागाई ४० वर्षांच्या उच्चांकावर आहे. भारतात मात्र मंदी येण्याचा प्रश्नच येत नाही. एका अहवालातही भारतात मंदीची शक्यता शून्य टक्के असल्याचे त्यांनी म्हटले.
मुलांनाही सोडत नाही
ग्राहकोपयोगी वस्तू गगनाला भिडत आहेत. तांदूळ, दही, पनीर यांसारख्या वस्तू, पेन्सिल आणि शार्पनरसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी वाढवण्यात आला आहे. सरकार मुलांनाही सोडत नाही.
- मनीष तिवारी, काँग्रेस नेते
खाद्यतेल उतरले
सरकारने महागाई कमी करण्यासाठी आयात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. महामारी, दुसरी लाट, ओमायक्रॉन, रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने महागाई दर ७ टक्क्यांवर ठेवण्यात यश मिळवल्याचे सीतारमण यांनी सांगितले.