ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटात केंद्राचे राज्य सरकारांना कडक निर्देश; २८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंधांमध्ये वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 08:15 PM2022-01-27T20:15:29+5:302022-01-27T20:16:05+5:30
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली-
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं डिसेंबर महिन्यात ज्या गाइडलाइन्स जारी केल्या होत्या त्या आता २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचं गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संबंधी नियमांचं प्रत्येक राज्यांना पालन करायला हवं असं गृह सचिवांनी नमूद केलं आहे.
देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण २२ लाखांवर पोहोचले आहेत. असं असलं तरी रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण वाढती रुग्णसंख्या पाहता गाफील राहून चालणार नाही. देशातील एकूण ३४ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील एकूण ४०७ जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून अधिक नोंदविण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक सावधनता बाळगण्याची गरज असल्याचं देखील भल्ला म्हणाले.
पाचस्तरीय रणनितीवर काम करण्याची गरज
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आपल्याला पाच स्तरीय रणनितीवर काम करण्याची गरज असल्याचं अजय कुमार भल्ला म्हणाले. ते म्हणाले की, "टेस्ट, ट्रॅक, लसीकरण आणि कोरोना गाइडलाइनचं पालन याच गोष्टी आपल्याला कोरोना महामारी विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी मदत करतील. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची आवश्यक असून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे"