रस्ते सुरक्षा अभियानातूनही आमीरला हटवले
By admin | Published: January 10, 2016 03:24 PM2016-01-10T15:24:28+5:302016-01-10T16:13:47+5:30
अतुल्य भारत पाठोपाठ आमीर खानला रस्ते सुरक्षेच्या जाहीरात मोहिमेतूनही हटवण्यात आल्याचे इंग्रजी दैनिक 'द टेलीग्राफ'ने वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - अतुल्य भारत पाठोपाठ आमीर खानला रस्ता सुरक्षेच्या जाहीरात मोहिमेतूनही हटवण्यात आल्याचे वृत्त इंग्रजी दैनिक 'द टेलीग्राफ'ने दिले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये रस्ते सुरक्षा अभियानाचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर म्हणून आमीर खानबरोबर करार करण्यात आला होता.
स्वत:हा केंद्रीय वाहतूक आणि रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमीरला ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातील रस्ते अपघातासंदर्भातील भाग पाहिल्यानंतर गडकरींनी आमीरला रस्ता सुरक्षेसाठी ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनवण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी स्वत:हा आमीरशी चर्चा केली होती. मुंबईत गडकरींची भेट घेतल्यानंतर आमीरही दूरचित्रवाहिनी आणि प्रिंट माध्यमासाठी एकही पैसा न घेता जाहीरात करण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर मंत्रालयाने जाहीरात तयार करण्यासाठी जाहीरात दिग्दर्शक पियुष पांडेंशी संपर्क साधला होता.
पियुष पांडे आणि मंत्रालयाच्या अधिका-यांमध्ये जाहीरात कशी असावी याबद्दल चर्चेच्या अनेक फे-याही झाल्या. त्यानंतर पियुष पांडे आणि गडकरींमध्ये ऑक्टोंबर महिन्यात भेट ठरली होती. मात्र गडकरींच्या कार्यक्रमात बदल झाल्यामुळे ही भेट रद्द झाली. डिसेंबरपर्यंत ही भेट पुढे ढकलली.
या दरम्यान आमीरने नोव्हेंबर महिन्यात एका कार्यक्रमात असहिष्णूतेसंदर्भात केलेल्या विधानाने नवा वाद उभा राहिला. त्यामुळे आता मंत्रालयाने आमीरच्या जागी रस्ते सुरक्षा अभियानासाठी नवा चेहरा शोधण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. याच आठवडयात आमीरबरोबर अतुल्य भारतच्या जाहीरात मोहिमेचा करार वाढवण्यास पर्यटन मंत्रालयाने नकार दिला होता.