"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 03:28 PM2024-05-25T15:28:23+5:302024-05-25T15:47:47+5:30
Lok Sabha Elections 2024: इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाही, असे अमित शाह म्हणाले.
हमीरपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. हमीरपूरमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसच्या तिकिटावर सतपाल रायजादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाही, असे अमित शाह म्हणाले. तसेच, एका पत्रकाराने त्यांना (इंडिया आघाडी) विचारले तुमचा पंतप्रधान कोण होणार? तर त्यांनी उत्तर दिले की, प्रत्येक एका वर्षासाठी एक व्यक्ती होईल. असे कुठे सरकार चालते का? असा सवाल करत १४० कोटी लोकसंख्येचा देश चालवणे सोपे काम नाही, असे अमित शाह म्हणाले.
या निवडणुकीत एकीकडे राहुल बाबा आहेत, जे दर सहा महिन्यांनी सुट्टी साजरे करतात आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, जे २३ वर्षांपासून दिवाळीतही सीमेवर लष्कराच्या जवानांसोबत मिठाई खात आहेत. देशातील जनतेसमोर दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत, असे अमित शाह म्हणाले. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि पाकिस्तानजवळील अणुबॉम्बबाबतच्या वक्तव्यावरून अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राहुल आणि त्यांची बहीण सुट्ट्यांसाठी शिमल्यात येतात, पण रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला हजर राहत नाहीत. हे लोक अयोध्येतील राम मंदिरात जात नाहीत, कारण त्यांना त्यांच्या व्होटबँकेची भीती वाटते, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
"Rahul Baba and his sister came to Shimla for holidays, but did not attend Pran Pratishtha": Amit Shah
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2024
Read @ANI Story | https://t.co/vSkQ1ksoU8#AmitShah#RahulGandhi#BJP#Congresspic.twitter.com/fuwiUeS6xU
अमित शाह यांनीही पीओकेबाबत काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. "काँग्रेस नेते आम्हाला पीओकेबद्दल बोलू नका म्हणून घाबरतात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आज मी देवभूमीला सांगतो, आम्ही भाजपावाले अणुबॉम्बला घाबरत नाही. मी हे स्पष्टपणे सांगतो - पीओके भारताचा आहे, राहील आणि आम्ही तो घेऊ.", असे अमित शाह म्हणाले. तसेच, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४० च्या खाली जाईल. तर एनडीए ४०० पार करत असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला. याशिवाय, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, त्यांनी केवळ त्यांच्या क्षेत्राचीच काळजी घेतली नाही तर देशभरातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले.