भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:00 PM2019-05-28T15:00:05+5:302019-05-28T15:02:01+5:30
२०१२ मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल करण्यात आला होता.
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची निवड करण्यासाठी पक्षाच्या कलम २१ या घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांच्याकडून ठेवला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्षाने मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं आहे. तसेच गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शहा निवडून आलेले आहे. अमित शहा यांनी सरकारमध्ये मंत्रीपद घ्यावं यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र सध्याच्या काळात जोवर पर्यायी व्यवस्था होत नाही तोवर शहा यांनाच अध्यक्षपद सांभाळावे लागणार आहे.
२०१२ मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. यानंतर भाजपाचा कोणताही सदस्य सलग दोनवेळा अध्यक्ष बनू शकतो. भाजपा अध्यक्षपदाचा कालावधी ३ वर्ष आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा बहुमतात केंद्रात सत्ता मिळवली होती. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह होते. मोदी सरकारच्या काळात राजनाथ सिंह यांना गृहमंत्री बनविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. राजनाथ सिंह यांचा कार्यकाळ अमित शहा यांनी पूर्ण केला. जानेवारी २०१६ मध्ये अमित शहा यांना दुसऱ्यांदा भाजपाचे अध्यक्ष बनविण्यात आले. त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला आहे. मात्र सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत लोकसभा निवडणूक होईपर्यंत अमित शहा यांना हंगामी अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे आता पुन्हा अमित शहा यांना अध्यक्षपदी कायम ठेवायचं असेल तर पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
१९९६ लोकसभा निवडणूक आणि १९९८ लोकसभा निवडणूक भाजपाने अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात लढवली होती. १९९६ मध्ये फक्त १३ दिवसांसाठी वाजपेयी सरकार सत्तेत आली. त्यानंतर १९९८ मध्ये पुन्हा वाजपेयी सरकार सत्तेत आलं. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी भाजपाचे अध्यक्ष होते. वाजपेयींच्या काळात लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री झाले तेव्हा त्यांना भाजपाचे अध्यक्षपद सोडावे लागले. त्यामुळे अमित शहा यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपद द्यायचं असेल तर पक्षात घटनेत आवश्यक बदल करावे लागणार आहेत.