भाजपाध्यक्ष अमित शहा यांना शेतक-यांचे तिखट प्रश्न, उत्तर देता देता झाली दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 05:36 PM2018-02-26T17:36:58+5:302018-02-26T17:36:58+5:30
जवळपास एक हजार शेतकरी अमित शहांकडे आपले प्रश्न घेऊन आले होते. पण फक्त पाच शेतक-यांनाच प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली होती
चेन्नई - भाजपाध्यक्ष अमित शहा सध्या हैदराबाद-कर्नाटकच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी काही शेतक-यांची भेट घेतली. मात्र शेतक-यांचे प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना उत्तर देता अमित शहांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळाली. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं अमित शहांना जमत नव्हतं. रविवारी 25 फेब्रुवारीला अमित शहांनी हुमनाबाद येथे शेतक-यांची भेट घेतली. जवळपास एक हजार शेतकरी अमित शहांकडे आपले प्रश्न घेऊन आले होते. पण फक्त पाच शेतक-यांनाच प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली होती.
शेतक-यांच्या नेत्यांनी अमित शहा यांना शेतक-यांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून करण्यात येणा-या उपाययोजनांवर प्रश्न विचारले. शेतकरी नेता सिद्धरमप्पा यांनी अमित शहांना विचारलं की, 'तुमच्याकडे व्यवसायिकांचं 17,15,100 कोटींचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत. पण 12,60,000 कोटींचं शेतकरी कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत. तुम्हाला सत्तेत आणण्यामध्ये फक्त व्यवसायिकांची नाही तर शेतक-यांचीही मते होती हे लक्षात असू दे'.
या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहांनी सांगितलं की, 'केंद्र सरकारने कोणत्याही व्यवसायिकाचं कर्ज माफ केलेलं नाही'. पुढे ते बोलले की, 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच मोदी सरकारने व्यवसायिकांचं कर्ज माफ केल्याचं म्हणत असतात. पण आम्ही कोणाचंही कर्ज माफ केलेलं नाही, फक्त टॅक्सचे दर कमी केले आहेत'. मात्र यावेळी त्यांनी शेतक-यांनी बँकांकडून घेतलेलं कर्ज माफ केलं जाणार की नाही याबद्दल सांगितलं नाही.
भाजपाने स्वामीनाथन रिपोर्ट लागू करण्यासाठी सांगितलं होतं, तर मग युटर्न का घेतला ? असा प्रश्न विचारला असता अमित शहांनी उत्तर दिलं की, 'रिपोर्टमधील प्रमुख शिफारशी स्विकारण्यात आल्या असून त्यादृष्टीने काम सुरु आहे'.