अमित शहा : मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करणारा भाजपाचा सेनापती
By बाळकृष्ण परब | Updated: May 27, 2019 17:22 IST2019-05-27T16:35:39+5:302019-05-27T17:22:21+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या विजयाचे श्रेय अर्थातच नरेंद्र मोदींना दिले गेले. मात्र भजपाच्या या यशामध्ये नरेंद्र मोदींइतकाच वाटा जर कुणाचा असेल तर तो भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा.

अमित शहा : मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करणारा भाजपाचा सेनापती
- बाळकृष्ण परब
गुरुवारी लागलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएने घवघवीत यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच भाजपाचे बहुमत हुकणार का? एनडीएला 272 चा आकडा गाठता न आल्यास विरोधकांची अभूतपूर्व आघाडी होऊन देशात सत्तांतर होईल का? अशा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा सुरू होती. त्यात एक्झिट पोल आल्यावर संभ्रम अधिकच वाढला. मात्र प्रत्यक्ष निकाल लागले आणि त्यात भजपाने बहुमतच नाही तर थेट तीनशेपार मजल मारली. एनडीएचा आकडा तर साडेतीनशेच्या पार गेला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपाच्या या विजयाचे श्रेय अर्थातच नरेंद्र मोदींना दिले गेले. मात्र भजपाच्या या यशामध्ये नरेंद्र मोदींइतकाच वाटा जर कुणाचा असेल तर तो भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा.
मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा आणि भाषणे या निवडणुकीतही प्रभावी ठरली तरी त्याचा प्रत्यक्ष जमिनीवर प्रभाव निर्माण करण्याची कामगिरी अमित शहा यांनी पार पाडली. त्यांच्या प्रभावी संघटनाबांधणीमुळेच पश्चिम बंगाल, ओदिशा, पूर्वोत्तर भारत, तेलंगणा आदी राज्यांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. अगदी महाआघाडीने कडवे आव्हान उभे केलेल्या उत्तर प्रदेशातही अमित शहांच्याच रणनीतीमुळे भाजपाने घवघवीत यश मिळवले. साधारण सहा सात वर्षांपूर्वी अमित शहा यांना एका न्यायालयीन प्रकरणात गुजरातमधून हद्दपार करण्यात आले होते. त्यावेळी गुजरातबाहेर असलेल्या अमित शहांकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली गेली होती आणि तिथे अमित शहांनी अडगळीत पडलेल्या भाजपाच्या संघटनेत नवे प्राण फुंकून लोकसभा निवडणुकीत 71 जागा जिंकून देण्याचा चमत्कार घडवला होता. याचं बक्षीस म्हणून त्यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद सोपवले गेले. अमित शहांचे कर्तृत्व दिसले ते यानंतरच.
या निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये एक गोष्ट समोर आली ती म्हणजे या पक्षाने यापूर्वी प्रभाव नसलेल्या भागात मिळवलेल्या लक्षणीय जागा. काही वर्षांपूर्वी भाजपा हा उत्तर भारतातील पक्ष असे म्हटले जात असे. अगदी 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपाने उत्तर भारताच्याच जोरावर बहुमत मिळवले होते. मात्र भाजपाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी भाजपाचे अस्तित्व नसलेल्या भागात पक्षविस्तारासाठी आक्रमक धोरण अवलंबले. विरोधी पक्षासाठी मोकळा अवकाश असलेल्या ओदिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर भारत आणि तेलंगणा, केरळमध्ये लक्ष केंद्रित केले गेले. पूर्वोत्तर भारतात काँग्रेसमधून आलेल्या हेमंत बिस्वा यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पक्षांची उप आघाडी सुरू केली गेली. त्यामुळे पूर्वोत्तर भारतात भाजपाची सत्ता स्थापन झाली.
त्याबरोबरच पश्चिम बंगालसारख्या राज्यात भाजपाने मिळवलेले यशही अमित शहांच्या पक्षविस्तारवादी राजकारणाचाच परिणाम म्हटला पाहिजे. डाव्यांचे राजकारण अस्तास जाऊन तृणमूलचा एकछत्री अंमल प्रस्थापित झालेल्या बंगालमध्ये भाजपाला असलेली संधी भाजपने हेरली. कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे जबाबदारी दिली गेली. स्वतः अमित शहा यांनी वारंवार बंगालचे दौरे करून प्रसंगी ममता बँनर्जींना थेट आव्हान देऊन येथील पक्षविस्तारास खतपाणी घातले. हाच प्रयोग ओदिशा, तेलंगणा आणि केरळ केला गेला. पैकी ओदिशा आणि तेलंगणामध्ये त्याला बऱ्यापैकी यश मिळाले.
अमित शहांच्या कुशल रणनीतीचे अजून एक उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशकडील निकालांकडे पाहता येईल. उत्तर प्रदेशात भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपा यांनी महाआघाडी केल्याने मतांच्या गोळाबेरीजेमुळे भाजपाला धक्का बसेल, असे अंदाज वर्तवले जाऊ लागले होते. मात्र या आघाडीला प्रत्युत्तर म्हणून 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याचे लक्ष्य अमित शहांनी ठेवले. त्यासाठी पन्नाप्रमुख, बुथप्रमुख अशी अगदी स्थानिक पातळीवर अधिकारविभागणी केली गेली. त्याचा परिणाम म्हणून बहुतांश मतदारसंघात भाजपाला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. तसेच 2014 च्या जवळ जाणारा विजय भाजपाला मिळाला.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे कमालीचे हेकेखोर आणि एकाधिकारशाही मनोवृत्तीचे आहेत, अशी टीका सातत्याने केली जाते. पाच वर्षांपूर्वी या जोडगोळीने दिल्लीत बस्तान बसवल्यानंतर याची अनेक उदाहरणे समोर आली. मात्र एनडीएतील मित्रपक्षांना सोबत न घेतल्यास नुकसान होऊ शकते याचा अंदाज आल्यावर मोदी आणि शहांनी लवचिक धोरण पत्करले. जेडीयू, आसाम गण परिषद या एनडीएला सोडून गेलेल्या मित्रपक्षांना पुन्हा एनडीएच्या छायेत आणण्याचा तसेच महाराष्ट्रात शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा धोरणीपणा भाजपाने दाखवला. अमित शहांच्या मित्रपक्षांना सांभाळून घेण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्र, बिहार आणि आसाममध्ये भाजपा आणि एनडीएला दणदणीत यश मिळाले. एकंदरीत नरेंद्र मोदींची प्रचंड लोकप्रियता आणि प्रभाव यांचा प्रत्यक्ष राजकारणाच्या रणांगणात पुरेपूर वापर कसा करायचा याचे तंत्र अमित शहांनी विकसित केले आहे आणि आगामी काळातही त्याचे परिणाम दिसत राहणार आहेत.