सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 06:29 AM2024-05-12T06:29:54+5:302024-05-12T06:30:33+5:30
पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर १० दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सर्जिकल हल्ले करण्यात येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
हैदराबाद: सर्जिकल तसेच हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर १० दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सर्जिकल हल्ले करण्यात येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले.
तेलंगणातील विकाराबाद व नागरकर्नुल या ठिकाणी अमित शाह यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची भीती दाखवत काँग्रेस पाकव्याप्त काश्मीरवरचा भारताचा हक्क सोडून द्या, असे सुचवत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे अणुचाचण्या केल्या व भारताला आण्विक शक्तिधारी देश बनविले. पाकव्याप्त काश्मीरवरचा हक्क भारत कधीही सोडणार नाही. भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असून, पाकिस्तानच्या गोळीला आम्ही तोफगोळ्याने प्रत्युत्तर देऊ, असे शाह म्हणाले.
अणुबॉम्बचे भय दाखवून काँग्रेस घाबरवत आहे : पंतप्रधान मोदी
फुलबनी/बोलंगीर : भारताने जगाला आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. मात्र पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, तेव्हा सांभाळून राहा असे सांगून काँग्रेस भारतालाच वारंवार घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर यांनी पाकिस्तान व भारताबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात अय्यर यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी त्यांना टोला लगावला.
ओडिसातील कंधमाल आणि बोलंगीर लोकसभा मतदारसंघांम मोदी यांनी निवडणूक प्रचारसभा घेतल्या. त्यात मोदी म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ५०ही जागा जिंकू शकणार नाही. तसेच त्या पक्षाला निवडणुकांनंतर विरोधी पक्षाचा दर्जा मिळणे देखील मुश्कील होईल, असा दावा मोदी यांनी केला. ते म्हणाले की, ओडिसाची अस्मिता धोक्यात आली असून भाजपच तिचे उत्तमप्रकारे रक्षण करू शकेल. ओडिसामध्ये व केंद्रामध्ये भाजपचे सरकार आले तर ज्या भूमिपुत्राला किंवा भूमिपुत्रीला ‘उडिया’ भाषा येते अशा व्यक्तीलाच आम्ही मुख्यमंत्री करू.