अमित शहांना बोलूच दिले नाही,राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:40 AM2018-08-03T05:40:59+5:302018-08-03T05:40:59+5:30
आसामच्या नॅशनल सिटिझन्स रजिस्टरच्या मुद्द्यावर दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांचे आक्रमक भाषण राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ करून ते हाणून पाडले.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : आसामच्या नॅशनल सिटिझन्स रजिस्टरच्या मुद्द्यावर दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांचे आक्रमक भाषण राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ करून ते हाणून पाडले, तर गुरूवारीही खरीप पिकांच्या हमीभावावर अमित शहांना बोलू द्यायचे नाही, असा निर्धार विरोधकांनी केल्याचे दिसले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा तुम्हाला नको आहे काय? असा सवाल विचारीत सभापती व्यंकय्या नायडूंनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
खरीप पिकांच्या हमीभावाच्या मुद्द्यावर आज चर्चा होणार होती. शिवायलोकसभेत मंजूर झालेले १२ वर्षांखालील बालिकांवरील बलात्काºयांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे दुरुस्ती विधेयक चर्चेसाठी येणार होते. शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित विधेयकही मंजुरीच्या प्रतिक्षेत होते.
दुपारी सभापतींनी खरीप पिकांच्या हमीभावाचा विषय पुकारला. अमित शहा बोलायला उभे रहाणार तोच तृणमूलचे डेरेक ओब्रायन व अन्य विरोधकांनी आसामच्या नॅशनल सिटिझन्स रजिस्टरची
अर्धवट राहिलेली चर्चा पूर्ण करा, गृहमंत्र्यांचे उत्तर आम्हाला ऐकायचे आहे, अशी मागणी करीत पुन्हा गोंधळ घातला.
त्यावर आसामवर चर्चा झाली आहे . पुन्हा चर्चा होणार नाही, असे सभापतींचे उत्तर ऐकताच शरद पवार म्हणाले की, आसामचा विषय संवेदनशील असून, गृहमंत्र्यांचे
निवेदन आवश्यक आहे. ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही आसामची चर्चा आम्हाला ऐकायची आहे, असा आग्रह धरला.
उपसभापतीपदी कहकशा परवीन?
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू प्रश्नोत्तराच्या तासाचे काम अन्य कोणावर सोपवत नाहीत. पण गुरुवारी सभापतींनी संयुक्त जनता दलाच्या श्रीमती कहकशा परवीन यांच्याकडे प्रश्नोत्तराच्या तासाची जबाबदारी सोपवताच, त्या सत्ताधारी आघाडीतर्फे उपसभापतीपदाच्या भावी उमेदवार असल्याची कुजबूज सुरू झाली.
सभापती म्हणाले की, ‘आज मी नवा प्रयोग करणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज श्रीमती कहकशा परवीन यांच्याकडे सोपवणार आहे. कहकशा चा अर्थ तारांगण. सर्वांचे त्यांनायोग्य ते सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. भागलपूरचे एके काळी महापौरपद सांभाळणाºया कहकशा परवीन यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यापूर्वी बिहार महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या.