ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही; सोनिया गांधींचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:34 PM2019-12-16T17:34:20+5:302019-12-16T17:40:13+5:30
Citizen Amendment Act : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.
नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही, असं म्हणत सोनिया गांधींना थेट आव्हान दिलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्यावरून अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला आहे. आसाम आणि त्रिपुराच्या अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आलं आहे. अमित शाह हे ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु तिथली परिस्थिती चिघळलेली असल्यामुळे त्यांनी ईशान्य भारताचा दौरा रद्द केला होता.
सरकारनं शांती आणि सौहार्द कायम ठेवलं पाहिजे. कायद्याचं शासन चालायला हवं. संविधानाची रक्षा करायला हवी. परंतु भाजपा सरकार देश आणि देशावासीयांवरच हल्ले करत आहे. मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी आहे. मोदी सरकारनं देशाला द्वेषाच्या अंधकारात ढकलून दिलं आहे. तसेच तरुणांचं भवितव्य तापलेल्या भट्टीमध्ये सोडण्यात आलं आहे, असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.
नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले आहे. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद असल्याने काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे.
ईशान्य भारतानंतर या आंदोलनाचं लोण दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठातही हिंसाचार झाला आहे. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले असून, विद्यापीठाला बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके काल संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
या आंदोलनापायी विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून 5 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.