Amit Shah Video: अमित शहांनी माईकवर दोनदा थांबवले, पण अनिल विज काही भाषण थांबवेनात; काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 08:47 AM2022-10-28T08:47:58+5:302022-10-28T08:48:15+5:30
Amit Shah stopped Anil Vij: हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज उद्घाटनावेळी भाषण करत होते. यावेळी ते आक्षेपार्ह शब्द बोलले आणि भाषणही लांबविले. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना माईकवरून दोनदा थांबविण्याचा प्रयत्न केला.
देशातील अंतर्गत सुरक्षेवरून हरियाणाच्या सुरजकुंडमध्ये दोन दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी एक विचित्र प्रकार घडला आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज उद्घाटनावेळी भाषण करत होते. यावेळी ते आक्षेपार्ह शब्द बोलले आणि भाषणही लांबविले. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना माईकवरून दोनदा थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही विज थांबले नसल्याने अखेर शहांनी आता थांबवा, असे सुनावले.
आम्ही पोलिस अधीक्षकांना तासभर लोकांच्या समस्या ऐकून घेण्यास सांगितले आहे. संपूर्ण हरियाणातून येणाऱ्या लोकांच्या तक्रारीही आम्ही आठवड्यातून एकदा ऐकतो. जेव्हा एखादा अधिकारी आपले कर्तव्य नीट पार पाडत नाही, तेव्हा आपण त्याचा छळ करतो. त्याने चूक केली तर आपण त्याला शिक्षाही देतो, पण त्याने चांगले काम केले तर त्याला बक्षीसही देतो, असे विज आपल्या भाषणावेळी म्हणाले.
विज यांनी छळाचा शब्द वापरल्यावर व्यासपीठावर अस्वस्थता दिसू लागली. अमित शहांच्या टीमने लगेचच विज यांच्या माईककडे चिठ्ठी सोपविली. त्यात भाषण थांबविण्यास सांगण्यात आले. इकडे अमित शहांच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता दिसू लागली होती. परंतू विज यांनी भाषण सुरुच ठेवले. अखेर शहा यांनी त्यांच्याकडील माईक सुरु केला आणि 'अनिल जी थोडं थोडक्यात सांगावं लागेल. तुमची वेळ ५ मिनिटे होती, तुम्ही ८:३० मिनिटे बोललात. तुम्ही जरा आटोपते घ्या. तरच कार्यक्रम पुढे जाईल', असे सांगितले.
#Haryana के गृह मंत्री #AnilVij देश के गृह मंत्री #AmitShah के साथ चल रही बैठक में दे रहे थे लंबा-चौड़ा भाषण। इस बीच शाह ने उनके भाषण को बीच में रोकते हुए कह दी ये बात। पूरा मामला जानने के लिए देखें वीडियो। pic.twitter.com/yxv9MjHJgg
— I.khan S.P.(प्रदेश सचिव अल्पसंख्यक सभा) (@islamkhan919) October 28, 2022
विज यांनी याकडेही दुर्लक्ष केले आणि मी ११२ मोहिमेवर सांगत आहे, ती आम्ही कशी राबवित आहोत, असे उत्तर शहांना दिले. यावर अमित शहांनी विज यांना थेटच आता तुमचे भाषण थांबवा, आपल्याला वेळेनुसार पुढे जावे लागेल, असे सुनावले. यानंतर मात्र विज यांचा नाईलाज झाला आणि त्यानी भाषण थांबविले.