जुने हिशेब चुकते करण्यासाठी अमित शहांनी प्रतिष्ठेची केली निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 03:54 PM2017-08-08T15:54:31+5:302017-08-08T16:09:16+5:30
गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीला व्यक्तीगत संघर्षाची किनार आहे.
सूरत, दि. 8 - गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीला व्यक्तीगत संघर्षाची किनार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्याबरोबरच काही जुने हिशेब चुकते करण्याची संधी साधली आहे. अहमद पटेल यांना काँग्रेसचे चाणक्य म्हटले जाते. अमित शहा यांचे सुद्धा आज भाजपामध्येच तेच स्थान आहे. त्यामुळे या निवडणुकीचा जो काय निकाल लागेल त्याचा सहाजिकच दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेवर परिणाम होईल.
केंद्रात काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता असताना अमित शहा यांच्यावर खटले दाखल झाले. प्रामुख्याने सोहराबुद्दीन शेख, इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण शहा यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आला. शहा यांना एकवर्षासाठी गुजरातमधून तडीपारही व्हावे लागले. शहा यांना ज्या प्रकारे गोवण्यात आलं त्यामध्ये अहमद पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि गुजरात काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी भाजपाच्या पथ्यावर पडली आहे.
त्यामुळे राजकीय संधी साधण्यात अत्यंत वाकबगार असलेल्या शहा यांनी यानिमित्ताने अहमद पटेल यांची पुरती कोंडी केली आहे. काँग्रेससाठी प्रत्येक मत महत्वाचे झाले असून एक-एक मत मिळवण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे.
अहमद पटेल हे काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि विविध राज्यातील सत्तास्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे.
अहमद पटेल यांची राज्यसभेसाठीची ही पाचवी टर्म असून, ते 1992 पासून ते काँग्रेसच्या सर्वोच्च समितीचे सदस्य आहेत. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यानंतर अहमद पटेल तिस-या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जातात.
दोन पक्षांचे अध्यक्ष दोन सभागृहांमध्ये
गुजरात राज्यसभा निवडणुकांमुळे आणखी एक नवी घटना घडणार आहे. भाजपाचे अमित शहा राज्यसभेत निवडून जातील. तिकडे लोकसभेत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून गेलेल्या आहेत. त्यामुळे देशातील दोन प्रमुख पक्षांचे अध्यक्ष संसदेच्या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये दिसून येतील.