ममतांना धोबीपछाड देण्यासाठी अमित शाह शिकतायेत बंगाली भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 09:05 PM2020-01-01T21:05:54+5:302020-01-01T21:06:53+5:30
पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी दीड वर्षाच्या जवळपासचा काळ शिल्लक आहे.
कोलकाता- पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी दीड वर्षांच्या जवळपासचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगीत तालीम आतापासूनच सुरू झालेली आहे. ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारी केली आहे. तर भाजपाही यात मागे नाही. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, भाजपा 'मिशन 250' अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार आहे.
निवडणुकीत भाषेची अडचण उद्भवू नये म्हणून अमित शाहसुद्धा बंगाली भाषा शिकत आहेत. त्यासाठी त्यांनी एका बंगाली शिक्षकाकडे शिकवणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी बंगाली भाषेतून लोकांशी संवाद साधतात. त्या तुलनेत भाजपाकडे बंगाली बोलणारं कोणतंही तगडं नेतृत्व नाही. त्याच अनुषंगानं शाह यांनी बंगाली भाषा शिकण्याचा पण केला आहे. जेणेकरून बंगाली भाषा समजणं आणि पश्चिम बंगालच्या सभांमध्ये भाषणांची सुरुवात निदान बंगाली भाषेतून करता येईल, अशी त्यांची मनीषा आहे.
ममता बॅनर्जी भाषणांमध्ये बऱ्याचदा भाजपाला बाहेरचे असे संबोधतात. अमित शाह यांना निवडणुकीच्या रणनीतीचे चाणक्य समजलं जातं. प्रत्येक निवडणुकीसाठी शाह वेगवेगळी रणनीती तयार करतात. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीत चुकलेली रणनीती आणि झारखंडमध्ये पक्षाला स्वीकारावा लागलेल्या पराभवानंतर अमित शाहांना बंगालच्या निवडणुकीची धुरा सांभाळायची आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
294 विधानसभेच्या जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपानं 'मिशन 250'चं लक्ष्य निर्धारित केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपानं जवळपास 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. तर तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या. तृणमूलला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी पहिल्यांदाच भाजपानं बंगालमध्ये दोन आकडी जागा मिळवल्या होत्या.