Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर अमित शहा नाराज? एनसीबीच्या मुख्यालयालाही आर्यन खान प्रकरणी ठेवले अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 10:16 AM2021-10-31T10:16:12+5:302021-10-31T10:18:56+5:30
Sameer Wankhede in trouble Aryan Khan Drug case: भाजपचे काही नेते तीन दिवसीय परिषदेसाठी दिल्लीत हाेते. त्यावेळी शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली.
- हरीश गुप्ता
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आर्यन खान ड्रग्स प्रकरण नार्काेटिक्स कन्ट्राेल ब्युराेचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने हाताळले, त्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या प्रकरणावरून अतिशय नाराज आहेत. या प्रकरणातील महत्त्वाच्या माहितीबाबत एनसीबीच्या मुख्यालयालाही अंधारात ठेवल्याचे समाेर आल्याचे सूत्रांनी गाेपनीयतेच्या अटीवर सांगितले आहे.
भाजपचे काही नेते तीन दिवसीय परिषदेसाठी दिल्लीत हाेते. त्यावेळी शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले आहे. तरीही आर्यन प्रकरणाचा तपास आणि हाताळण्याच्या पद्धतीमध्ये काही चुका समाेर आल्या आहेत.
सरकारच्या बदनामीचीही चिंता
एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले, की नार्काेटीक्स ब्युराेच्या दैनंदिन कारभारामध्ये गृहमंत्रालय हस्तक्षेप करत नाही. मात्र, संस्थेची प्रतिमा मलिन हाेणे आणि सरकारची बदनामी हाेईल, असे कृत्य करण्याची परवानगी एका अधिकाऱ्याला दिली जाऊ शकत नाही.
तपासामध्ये त्रुटी
नार्काेटीक्स ब्युराेचे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांनाही तपासामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासामध्ये वानखेडे यांना माेकळीक दिली नाही.
संवेदनशील प्रकरण
विभागीय कार्यालयाने दिल्लीतील मुख्यालयाला संपूर्ण माहिती दिली नव्हती. आर्यनकडे ड्रग्स आढळले नव्हते, ही माहिती मुख्यालयाला दिलीच नसल्याचे आढळले. त्यामुळे मुख्यालयाला प्रत्येक तासाला माहिती दिली हाेती. हे प्रकरण संवेदनशील असल्याने ही माहिती गृहमंत्रालयाला देण्यात आली.