कोणत्याही परिस्थितीत CAA मागे घेणार नाही; अमित शाह कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:12 PM2020-01-21T15:12:47+5:302020-01-21T15:13:17+5:30
देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले.
नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायद्याच्या (CAA) समर्थनात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे घेतलेल्या सभेत आपण हा कायदा कदापी मागे घेणार नसल्याचे खडसावून सांगितले. 'भारता माता की जय'चा जयघोष करत शाह यांनी देशात सीसीए कायद्यावरून होणाऱ्या हिंसेला विरोधी पक्ष जबाबदारी असल्याचे सांगितले.
अमित शाह म्हणाले की, नागरिकता कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होईल असे गैरसमज पसरवले जात आहेत. ममता दीदी, राहुल बाबा, अखिलेश यादव तुम्ही चर्चा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाण शोधून ठेवा. आमचा स्वतंत्र देव चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे शाह यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
सीसीएमधील एकही कलम एखाद्या मुस्लीम, अल्पसंख्यांकाची नागरिकता घेत असेल तर मला कळवावे, असे आवाहन शाह यांनी केले आहे. यावेळी शाह यांनी जेएनयूच्या मुद्दावर आपले मत मांडले. दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी नारेबाजी करण्यात आली. भारताचे हजार तुकडे करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारागृहात टाकले. मात्र राहुल गांधी यावर म्हणतात की, विद्यार्थ्यांना बोलण्याचे स्वातंत्र आहे.
मी विरोधकांना खडसावून सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत CAA कायदा मागे घेतला जाणार नसल्याचे शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले.