८ कॅबिनेट समित्यांत अमित शहा सदस्य; सहा समित्यांमध्ये पंतप्रधान सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:00 AM2019-06-07T03:00:27+5:302019-06-07T06:37:09+5:30
गुरुवारी स्थापन केलेल्या नियुक्तीविषयक कॅबिनेट समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. निवासव्यवस्था संदर्भातील कॅबिनेट समितच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार आहेत.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : आर्थिक बाबी, नियुक्ती, निवासव्यवस्था, संसदीय कामकाज, राजकीय बाबी अशा पाच विषयांवरील कॅबिनेट समित्यांची मोदी सरकारने गुरुवारी स्थापना केली. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आठही कॅबिनेट समित्यांमधील समान दुवा म्हणजे त्या सर्वांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर सहा कॅबिनेट समित्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सदस्य आहेत.
गुंतवणूक व बेरोजगारी-कौशल्यविकास तसेच सुरक्षा या विषयांवरील तीन कॅबिनेट समित्यांची स्थापना मोदी सरकारने बुधवारी केली होती.
गुरुवारी स्थापन केलेल्या नियुक्तीविषयक कॅबिनेट समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. निवासव्यवस्था संदर्भातील कॅबिनेट समितच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पियुष गोयल हे सदस्य असतील. तर पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच गृहनिर्माण, नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री हरदीप पुरी हे या समितीवर विशेष निमंत्रित आहेत.
राजकीय बाबीविषयक समितीत अरविंद सावंत
संसदीय कामकाज समितीचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे असून त्यामध्ये प्रकाश जावडेकर, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, थावरचंद गेहलोत आदी मंत्री सदस्य आहेत. राजकीय बाबीविषयक समितीचे पंतप्रधान मोदी अध्यक्ष असून त्यात अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, हर्षवर्धन आदी मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान अध्यक्षस्थानी असलेल्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक समितीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आदी मंत्री सदस्य आहेत.