नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानानंतर शाहांनी गिरिराज सिंहांना फटकारलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 08:17 AM2019-06-05T08:17:14+5:302019-06-05T08:17:33+5:30
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. अमित शाहांनी फोन करून गिरिराज सिंह यांना तंबी दिली आहे. तसेच अशा प्रकारची तक्रार पुन्हा येता कामा नये, असंही बजावलं आहे. गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी इफ्तार पार्टीत घेतलेल्या सहभागावर ट्विट करत टिपण्णी केली होती. गिरिराज सिंहांच्या त्या ट्विटनंतर बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमधलं वातावरण गढूळ झालं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांबरोबर वादविवाद होऊ लागले. या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, काही लोकांना कायम चर्चेत राहण्याची आवड असते, त्यामुळे ते असं काही तर बरळतात. दुसरीकडे गिरिराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो ट्विटवर शेअर केले होते. ज्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपा नेते सुशील मोदी, जीतनराम मांझी, रामविलास पासवान आणि त्यांचा मुलगा चिराग पासवान हे एकत्र इफ्तार पार्टीत दिसत होते. गिरिराज सिंह यांनी ते फोटो ट्विट करत नितीश कुमारांना टार्गेट केलं आहे. ते म्हणाले, नवरात्रीतही असं चित्र पाहायला मिळालं असतं तर ते किती सुंदर दिसलं असतं. आपल्या कर्म-धर्माकडे आपण पाठ का फिरवतो. दिखावा करण्यासाठी सगळं करत असतो. बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह निवडून आले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं असून, त्यांच्याकडे पशुपालन, डेअरी आणि मत्स्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपा 40 पैकी 17-17 जागांवर लढली होती. तर सहा जागा लोकजनशक्ती पार्टीला सोडण्यात आल्या होत्या.
कितनी खूबसूरत तस्वीर होती जब इतनी ही चाहत से नवरात्रि पे फलाहार का आयोजन करते और सुंदर सुदंर फ़ोटो आते??...अपने कर्म धर्म मे हम पिछड़ क्यों जाते और दिखावा में आगे रहते है??? pic.twitter.com/dy7s1UgBgy
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) June 4, 2019
तर दुसरीकडे इफ्तारविषयी राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, आम्हाला नितीश कुमार यांचे वावडे (अॅलर्जी ) नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. तुमचे हे म्हणजे लालूप्रसाद यादव यांना मान्य होईल का, या प्रश्नावर सिंह म्हणाले की, मी आता माझे म्हणणे उघडपणे व्यक्त केले आहे. मी आणि लालुप्रसाद यांनी अनेक वर्षे एकत्र कामही केले आहे. नितीश कुमार यांच्याविषयी मांझी म्हणाले की, त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्याने माझे व त्यांचे बिनसले होते. पण त्याला चार वर्षे झाली. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माझे नितीश यांच्याशी कायमचे भांडण नाही.
वेगळे होण्याची तयारी?
केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला एकच मंत्रिपद देऊ केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाने मोदी मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर नंतर स्वत:च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपला विश्वासातही घेतले नाही. आता राज्यात स्वत:चा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने नितीश कुमार यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाण्याची चर्चा सुरू आहे.