अमित शहा-नितीशकुमार यांच्यात १२ जुलैला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:09 AM2018-07-02T02:09:34+5:302018-07-02T02:10:22+5:30
भाजपाध्यक्ष अमित शहा आणि जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर १२ जुलै रोजी बैठक होणार आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शहा आणि जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर १२ जुलै रोजी बैठक होणार आहे. एनडीएचे घटक पक्ष जनता दल यूनायटेड, एलजेपी आणि आरएलएसपी यांच्यातील जागावाटपाच्या मुद्यावर लवकरच तोडगा निघेल, असे सांगितले जात आहे. तथापि, अन्य मुद्यांमुळे नितीशकुमार यांची काळजी वाढलेली आहे.
दोन्ही पक्षांतील मतभेद कायम
भाजप नेते आणि अन्य संघटना यांच्यामुळे राज्यातील जातीय सलोखा राखण्यात अडथळे येत असल्यामुळे नितीशकुमार यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जेडीयू आणि भाजपमध्ये जागावाटप हा वादाचा प्रमुख मुद्दा आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा निकष वापरता येणार नाही. २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी होती, असे मत व्यक्त होत आहे. तथापि, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीशकुमार हे करत आहेत. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदी किंवा भाजप नेतृत्व कुठलाही शब्द देत नाहीत. पाटण्यात राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी वेगवेगळे संकेत मिळत आहेत. भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य जेडीयूकडून होत असतानाच भाजप नेत्यांनी म्हटले आहे की, नितीशकुमार यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी काँगे्रससोबत जवळीक वाढविली आहे.
काँग्रेसने बाळगले मौन
नितीशकुमार यांनी गतवर्षी नाट्यमय घडामोडीत राजदपासून दूर जाताना भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. तथापि, नितीशकुमार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अस्वीकार्य मागण्या करुन ही परिस्थिती आणली आहे. नितीशकुमार हे भ्रष्टाचाराबाबत तडजोड करु शकत नाहीत. त्यामुळेच त्यांनी राजदची साथ सोडली.