Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:31 PM2024-04-30T12:31:55+5:302024-04-30T12:39:44+5:30
Amit Shah And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये हत्या होऊ शकते, या आम आदमी पार्टीच्या (आप) दाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये हत्या होऊ शकते, या आम आदमी पार्टीच्या (आप) दाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "जेल दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येतं आणि आता त्यांचंच सरकार मारण्याचा प्रयत्न करत असेल, मग मी त्यासाठी काय करू शकतो" असं स्पष्टपणे अमित शाह यांनी म्हटलं आहे.
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तिहार जेलमध्ये दोन गटांमधील संघर्षाचा संदर्भ देताना अलीकडेच म्हटले होते की, जेलमध्ये यापूर्वीही हत्या झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे. संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तिहार जेल हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर रूम बनल्याचं म्हटलं होतं.
"पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) केजरीवाल यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून असल्याचं त्यांना सूत्रांकडून समजलं आहे. केजरीवाल यांची हेरगिरी करत असल्याचं दिसतंय. केजरीवाल यांना 23 दिवसांपासून इन्सुलिन देण्यात आलं नाही. दिल्लीतील जनतेची सेवा करणे हा केजरीवालांचा गुन्हा आहे का? त्यांच्याशी हे वैयक्तिक वैर का? विरोधी पक्षनेत्याचा जीव घेऊन त्याला संपवायचं आहे का? हे सर्व पीएमओ आणि एलजी यांच्या देखरेखीखाली होत आहे याचं मला दुःख आहे" असंही आप नेत्याने पत्रात म्हटलं होतं.
तिहारमध्ये कैद्यांमधील भांडणाची घटना समोर आल्यानंतर आपने केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. संजय सिंह म्हणाले की, तिहार जेलमध्ये हत्या झाल्याचं तुम्हाला माहीत आहे का? उद्या अरविंद केजरीवाल यांच्यावरही असाच हल्ला झाला तर काय होईल? तिहार तुरुंगात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे. तिहार तुरुंगातील सुरक्षेतील त्रुटी आणि झालेल्या हिंसाचाराचा दाखला देत आपने हे म्हटलं आहे.