अमित शाहंनी 188 पाकिस्तानी हिंदूंना दिले भारतीय नागरिकत्व, विरोधकांवर साधला निशाणा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 02:42 PM2024-08-18T14:42:54+5:302024-08-18T14:43:17+5:30
Amit Shah Attack Congress on CAA: विरोधक CAA बाबत देशातील मुस्लिमांना भडकावत आहे.
Amit Shah on CAA : देशात नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. आता रविवारी (18 ऑगस्ट 2024) देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA अंतर्गत 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व दिले. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भारताच्या शेजारील देशातील हिंदूंच्या परिस्थितीवरही भाष्य केले.
'विरोधक दिशाभूल करत आहेत...'
यावेळी अमित शाह म्हणतात, "बांग्लादेशात फाळणी झाली, तेव्हा तिथे 27 टक्के हिंदू होते, आज 9 टक्के शिल्लक आहेत. हिंदू गेले कुठे? आम्ही 2019 मध्ये CAA आणला, ज्यामुळे करोडो हिंदू, जैन आणि शीख धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळाले. इंडिया आघाडी CAA बाबत मुस्लिमांना भडकावण्याचे काम करत आहे. CAA कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. काही राज्य सरकारे CAA बद्दल लोकांची दिशाभूल करत आहेत."
अहमदाबाद में #CAA के तहत नागरिकता प्राप्त करने वाले बहनों-भाइयों के साथ संवाद कर रहा हूँ... https://t.co/ss3Oue9ZGK
— Amit Shah (@AmitShah) August 18, 2024
'काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे..'
"काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या हिंदू, बौद्ध आणि शीखांना न्याय मिळाला नाही. आश्वासन देऊनही या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. अशा करोडो लोकांना नरेंद्र मोदींनी न्याय दिला. मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना सांगतो की, तुम्ही नागरिकत्वासाठी कोणताही संकोच न करता अर्ज करा. तुमचे काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत," असेही शाह यावेळी म्हणाले.