नरेंद्र मोदींना पाठिंबा पण अमित शहांना विरोध, ममतांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या गोटात संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 12:31 PM2017-08-20T12:31:55+5:302017-08-20T12:34:55+5:30
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कोलकाता, दि. 20 - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी मोदी यांना आपला पाठिंबा असला तरीही मी भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या विरोधात असल्याचे सांगितले. ममता यांच्या या विधनामुळे विरोधकांच्या गोटात संभ्रम निर्माण झाला आहे. तर ममता बॅनर्जींनी आता मोदींचे धोरण स्वीकारल्याची चर्चा सुरु झाली आहे.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींनी मोदींविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. या मुलाखतीत बॅनर्जी म्हणाल्या, मी मोदींचे समर्थन करते, पण अमित शहांना माझा विरोध आहे, मी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत नाही. मी त्यांना का जबाबदार ठरवावं?, पण त्यांच्या पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. देशात हुकूमशाहीचे वातावरण असून एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (अमित शहा) सरकारी कामात हस्तक्षेप करत आहे असा दावा त्यांनी यावेळी केला. ममता बॅनर्जींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले. वाजपेयीदेखील भाजपचे नेते होते. पण ते संतुलित आणि निष्पक्ष नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला कधीच अडचणींचा सामना करावा लागला नाही असे त्या म्हणाल्या.
ही हुकूमशाहीच आहे- ममता बॅनर्जी
अमित शहा यांना लक्ष करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ह्यपक्षाचा अध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतो. ही हुकूमशाहीच आहे, पक्षाचा अध्यक्ष मंत्र्यांची बैठक कशी घेऊ शकतो. पंतप्रधान कोण आहे?, मोदी की शहा असा सवालच त्यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जींनी मोदींचे धोरण स्वीकारल्याचे संकेत दिले असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर मोदींचे समर्थन केल्याने विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
६ महिन्यांसाठी प्रतीक्षा करा, सर्व चित्र स्पष्ट होईल
ह्यविरोधी पक्षांमध्ये आता एकजूट झाली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात बदल होईल. ६ महिन्यांसाठी प्रतीक्षा करा, सर्व चित्र स्पष्ट होईलह्ण असेही बॅनर्जींनी म्हटले आहे. केंद्र सरकारवर कोणी टीका केल्यास ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचे पथक त्यांच्या घरात पोहोचते, असा आरोप देखील यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला.