हिंदूंवरील अन्यायामुळे मुफ्ती सरकारमधून बाहेर - अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 04:40 AM2018-06-24T04:40:42+5:302018-06-24T04:41:02+5:30
नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील विकासकामांसाठी जवळपास ८० हजार कोटींची निधी दिला होता परंतु हा पैसा जम्मू आणि लडाखपर्यंत पोहचलाच नाही
जम्मू : नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील विकासकामांसाठी जवळपास ८० हजार कोटींची निधी दिला होता परंतु हा पैसा जम्मू आणि लडाखपर्यंत पोहचलाच नाही, अशी प्रखर टीका भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी जम्मूमध्ये
केली. मेहबुबा मुफ्ती सरकारच्या काळात राज्यातील हिंदुबहुल इलाख्यावर कसा अन्याय झाला, या मुद्द्यावरच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला जाणार आहे, हे शहा यांनी आपल्या भाषणातून सूचित केले.
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ऐतिहासिक बलिदान दिनानिमित्त एका रॅलीला संबोधित करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा शनिवारी येथे आले. काही दिवसांपूर्वीच भाजपने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर शहा यांचा हा पहिला काश्मीर दौरा आहे.
यावेळी अमित शहा म्हणाले की, राज्यात विकासकामांमध्ये कायम दुजाभाव केला गेला. म्हणूनच जम्मू आणि लडाखच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला. या वाक्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
भाजपाला काश्मीर खोºयामध्ये फारसा रस नाही कारण तिथे पक्षाला २०१४ च्या निवडणुकीत अवघी २.२ टक्के मते मिळाली होती. तिथे पक्षाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाच्या एकूण २५ आमदारांपैकी २२ जम्मूतून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीतही लडाख, जम्मू आणि उधमपूरच्या जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यामुळे पक्षाने या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या तीन पिढ्यांनी आतापर्यंत जम्मू काश्मीरची सत्ता सांभाळली परंतु त्यांनी राज्यासाठी भरीव असे काहीही केले नाही. आम्ही काश्मीरी पंडितांना आर्थिक पाठबळ दिले. पंडितांना ४० वर्षांपूर्वी राज्यातून बेदखल करण्यात आले होते. पीडीपीने पंडितांसाठी काहीही केले नाही, अशीही टीका त्यांनी केली.
शहा यांचे जोरदार स्वागत करताना पक्षाच्या युवा शाखेने विमानतळ ते राज्य गेस्ट हाउसपर्यंत बाइक रॅली काढली. शहा यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना आणि अन्य वरिष्ठ नेते होते. अमित शहा हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. पक्षाच्या डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया स्वयंसेवकांसोबतही त्यांनी चर्चा केली. (वृत्तसंस्था)